अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे राष्ट्रीय आपत्ती दलाचे (एनडीआरएफ) बचाव पथक कायमस्वरूपी असणार आहे. यासाठी आवश्यक सुमारे पाच एकर क्षेत्र असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 28) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित झाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे तीन जिल्हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिसंवेदनशील आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे 22 जुलै रोजी आलेला महापूर आणि रायगडातील महाडच्या तळीये गावात दरड कोसळून घडलेली दुर्घटना. अशा आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दल हे मध्यवर्ती स्थळी कायमस्वरुपी तैनात असणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक शासकीय जागा मिळण्याकरिता दुग्धव्यवसाय कार्यालयाने सहमती दिल्याबाबत बुधवारी शासन निर्णय झाला. या शासन निर्णयानुसार महाड कार्यक्षेत्रातील दूध संकलनासाठी असलेल्या सर्व्हे क्र. 72-हिस्सा क्र. 02/06,7,8 तसेच सर्व्हे क्र. 74 अ-हिस्सा क्र. 1 ब व 1 क अशी एकूण 2.57.46 हेक्टर क्षेत्र एनडीआरएफ बेसकॅम्प कायमस्वरुपी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.