Breaking News

मुरूड तहसीलदारांसह दोन शिपाई लाचप्रकरणी जाळ्यात

मुरूड : प्रतिनिधी

नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी  मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह दोन शिपाई यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तक्रारदार यशवंत पाटील यांना मुरूड तहसील  कार्यालयाकडून नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी दाखला आवश्यक होता. हा दाखला मिळाल्यावर सदरची जमीन विकता येत होती. त्यासाठी यशवंत पाटील यांनी मुरूड तहसील कार्यालयाकडे 24 डिसेंबर 2020 रोजी अर्ज केला होता, मात्र वारंवार हेलपाटे मारूनसुद्धा त्यांना दाखला मिळत नव्हता. सदरचे काम होण्यासाठी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत यशवंत पाटील यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तहसीलदार गमन गावीत यांनी यशवंत पाटील यांना लाचेची रक्कम शिपाई प्रेमनाथ पाटील व संदेश वाळंज यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार यशवंत पाटील यांच्याकडून 15 हजार रुपये स्वीकारताना शिपाई प्रेमनाथ पाटील याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले व तहसीलदार गमन गावीत व दोन शिपायांना ताब्यात घेतले. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस नाईक निलेश पांचाळ, शिपाई मंगेश चव्हाण, सचिन माने यांनी ही कारवाई केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply