Breaking News

बल्लाळेश्वराच्या पालीत खड्यांचे विघ्न; रस्त्यावर साचलीत तळी; नागरिक व वाहनचालक त्रस्त

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. बल्लाळेश्वराच्या पालीतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत.आगामी येणारे सण-उत्सव पाहता पालीतील रस्ते लवकर सुस्थितीत करणे गरजेचे आहे. पालीतील स्टेट बँकपासून गांधी चौक, महावीर मार्ग ते थेट गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आगरआळी, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळीपर्यंतचा रस्ता, भोईआळी, मिनिडोअर स्टँड ते बसस्थानक पर्यंतच्या रस्त्याची भल्या मोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता प्रचंड फुटला आहे. पावसाचे पाणी साठल्याने वाहन चालकास या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे  या खड्ड्यात वाहन जोरात आदळते. खड्ड्यातील पाणी व चिखल पादचार्‍यांच्या अंगावर उडते. दुचाकी चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडीदेखील होत आहे.

उपाय कुचकामी

काही दिवसांपूर्वी बारीक खडी टाकून पालीतील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. मात्र सततचा पाऊस आणि वाहनांची वर्दळ यामुळे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आता तर हे खड्डे आणखी खोल व रुंद झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले होते, मात्र अतिवृष्टीमुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पालीतील रस्ते दुरुस्तीसाठी निधी आला आहे, पण पावसाळ्यात काम करता येणार नसल्याने ऑक्टोबर महिन्यात रस्ते नूतनीकरणाचे काम करण्यात येईल.

-दिलीप रायण्णावार,  प्रशासक, नगरपंचायत, पाली

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply