Breaking News

साखळी बॉम्बस्फोटांनी कोलंबो हादरले

163 जण मृत्युमुखी; 400हून अधिक जखमी

कोलंबो ः वृत्तसंस्था : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये काल ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला असून, 400हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, सकाळी सहा स्फोट झाल्यानंतर सुमारे पाच तासांनंतर आणखी दोन स्फोट घडवण्यात आल्याची माहिती कोलंबो पोलिसांनी दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या साखळी स्फोटांनंतर भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंका सरकारने श्रीलंकेत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. 

या साखळी स्फोटानंतर श्रीलंका सरकारने फेसबुक, ट्विटर असे सोशल मीडिया काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. येथील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण आठ बॉम्बस्फोट झाले. यात 163 तण ठार झाले असून, 400हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोलंबोतील दोन फाइव्ह स्टार हॉटेलांतही बॉम्बस्फोट झाले. कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. आतापर्यंत 400हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरू

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वृत्तामुळे कोट्यवधी भारतीय चिंतेत आहेत. श्रीलंकेतील कोलंबो शहरात राहणार्‍या भारतीय नागरिक, तसेच भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीयाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून आहोत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्विट भारतीय दूतावासाने केले आहे. या ट्विटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा यासाठी क्रमांकही देण्यात आले आहेत. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर शेकडो जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांकडून निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा रानटी घटनांना जगात कुठेही मुळीच थारा नसून या परिस्थितीत आपण श्रीलंकेच्या लोकांच्या सोबत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

पोलिसांनी आधीच दिला होता इशारा

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेआधीच पोलीस प्रमुखांनी आत्मघाती हल्ल्याचा इशारा दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि आसपासच्या परिसरातील सहा ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply