Breaking News

आजची शिवसेना उपर्‍यांचे वर्चस्व असणारी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा राऊतांवर प्रतिहल्ला

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप हा उपर्‍यांचा पक्ष झाल्याची टीका केल्यानंतर त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रतिहल्ला चढवला आहे. आजची शिवसेना पूर्णपणे उपर्‍यांचे वर्चस्व असणारी आहे. आपण आपल्या पक्षात असणारी उपर्‍यांची संख्या आणि भाजपमध्ये असलेल्या उपर्‍यांची संख्या याची आकडेवारी जनतेसमोर येऊ द्या, असे थेट आव्हान दरेकर यांनी राऊतांना दिले आहे. उदय सामंत मूळचे शिवसैनिक आहेत का? अब्दुल सत्तार 1966चे सैनिक आहेत का? शंकरराव गडाख कधी झाले शिवसैनिक? प्रियांका चतुर्वेदी खासदार आहेत, ऊर्मिला मातोंडकर कोण आहेत? अर्धे मंत्रिमंडळ उपर्‍यांनी भरलेले असताना भाजपवर उपर्‍यांना घेता, असा आरोप करणे किती संयुक्तिक आहे, असा सवाल दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे खुद्द शरद पवारांनाही रोज झालेल्या त्याच त्याच विषयांसाठी पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत. संजय राऊत यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. चर्चा करून चोथा झालेल्या ईडी, सीबीआय यंत्रणा गैरवापराची ढोलकी वाजवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय, असेही दरेकर म्हणाले. कलम 370 हटवूनही जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही, असे संजय राऊत म्हणाले. एकीकडे ते म्हणतात कलम 370 हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे. मग ते कलम काढले ही चूक झाली का? तुम्ही जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची काळजी करू नका. देशाचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. चिनी आक्रमण, काश्मीरची सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई करण्याची धमक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे दरेकर यांनी सांगितले. राऊतांना माझी विनंती आहे की, महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, खून, आत्महत्या अशा घटनांविषयी राज्य सरकारला सल्ला देऊन काही कारवाई झाली, तर आम्ही आपले अभिनंदन करू, असेही दरेकर म्हणाले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply