पूर्णठेव योजनेच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम होणार पूर्ण; आमदार रविशेठ पाटील यांनी केली कामाची पाहणी
पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पूर्णठेव योजनेमार्फत पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29.38 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या योजनेचे काम आता पूर्णत्वास येत आहे, त्यामुळे मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असणार्या खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 20) या योजनेच्या कामाची पाहणी केली.
आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी हेटवणे आणि शहापाडा धरणावर कामाची पाहणी करून अधिकार्यांकडून कामाची पूर्ण माहिती घेतली. हेटवणे धरणातील आरसीसी बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले असून, हेटवणे ते शहापाडा या वीस किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याचा मानस अधिकार्यांनी आमदार पाटील यांच्यासमोर व्यक्त केला. 27 जुलै 2021 पासून प्रारंभ केलेले हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून मार्च अखेर हेटवणे धरणापासून शहापाडा धरणापर्यंत हे पाणी पोहोचविण्यात येणार आहे. शहापाडा धरणापासून पुढे खारेपाट भागात पाणीपुरवठा करण्यासाठीदेखील पुढील पाईपलाईनचे काम सुरू असून खारेपाटातील 38 गावातील नागरिकांची तहान या योजनेमार्फत भागवली जाणार आहे.
कामाबाबत समाधान व्यक्त करत आमदार रविशेठ पाटील यांनी हा निधी उपलब्ध करून देणार्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या वेळी युवा नेते वैकुंठ पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच बळीराम भोईर, जीवन प्राधिकरणाचे प्रभारी उपअभियंता ए. डी. कोठेकर, जांभळे, ठेकेदार बंडू डोंगरे उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वीच या योजनेचे काम पूर्ण होणे गरजेचे होते, मात्र मागील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले. नव्या ठेकेदाराने युद्धपातळीवर काम सुरू असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
-रविशेठ पाटील, आमदार, पेण विधानसभा मतदारसंघ
27 जुलैपासून सुरू झालेले काम आता जवळपास पूर्णत्वास येत असून मार्च अखेरपर्यंत आम्ही शहापाडा धरणापर्यंत पाणी पोहोचविणार आहोत. त्या पुढील कामही लवकरात लवकर पूर्ण होईल, नागरिकांनी योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.
-ए. डी. कोठेकर, प्रभारी उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण