अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आंदोलन करणार्या शेकापने अलिबाग-मुरूड रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करावे. या कामाचा ठेकेदार कोण आहे? ते काम का रखडले? याचाही शोध घ्यावा, असे म्हणत शिवसेना जि. प. सदस्य मानसी दळवी यांनी शेकाप नेत्यांवर निशाणा साधला आहे. विकासकामे अडविण्याचे काम आम्ही करीत नाही. उलट शेकाप नेत्याच्या कंपनीमुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा आरोपही दळवी यांनी राजमळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी सोबत होते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे ते शिवसेना नेत्यांवर बेछूट आरोप करीत आहेत, पण जनता सुज्ज्ञ असून शेकापच्या कांगाव्याला बळी पडणार नाही. अलिबाग-मुरूड रस्त्याचे काम सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते, मात्र दोन वर्षे झाली तरी या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. ही कंपनी माजी आमदारांच्या कुटुंबीयांची आहे. कामाचा ठेका घेऊनही कंपनी काम का करीत नाही याचा शोध शेकापच्या नेत्यांनी घ्यावा. अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आंदोलन करणार्या शेकापला मुरूडकडे जाणारा रस्ता दिसत नाही का, असा सवाल दळवी यांनी या वेळी उपस्थित केला. अलिबाग-रोहा रस्त्याचे काम साकवांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी रखडले होते. ते आता मार्गी लागेल. जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिकांना नोकर्या मिळाव्या यासाठी शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली होती. या संदर्भात उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत स्थानिकांना नोकर्यांमध्ये प्राधान्य देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.