Breaking News

ठाकरे सरकारकडून शेतकर्‍यांना अल्प मदत

भाजप शनिवारी करणार आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी
अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावे लागणार्‍या शेतकर्‍यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी (दि. 30) पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा केली.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकर्‍यांच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. शेतकर्‍यांच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्द्धस्त झाली आणि पुढील किमान 10 वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकर्‍यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजी केली, पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकर्‍यांपर्यंत पोहचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्याच दौर्‍यात स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, मात्र मंत्रालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यास न्याय मिळालाच नाही, असा दावा उपाध्ये यांनी या वेळी केला.
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणांचे काय झाले? कोणत्या उपाययोजना अमलात आल्या? आणि किती गुन्हेगारांना कोणत्या शिक्षा झाल्या? हेदेखील जाहीर करण्याची हिंमत ठाकरे सरकारने दाखवावी, असे आव्हान उपाध्ये यांनी दिलेे.
गेल्या दोन वर्षांत खंडणी वसुली आणि टक्केवारीपलीकडे जनहिताची कोणतीही योजना न आखणार्‍या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येईल. भाजप कार्यकर्ते जागोजागी सरकारला जाब विचारतील. काळ्या कारभाराचे वाभाडे काढून जनतेसमोर सरकारचे स्वार्थी रूप उघड करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पैसा कुणाकडे पोहचला?
सेलिब्रिटींच्या बचावासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांची कारकिर्द पणाला लावून त्यांच्यासाठी कामे बाजूला ठेवून किल्ला लढविणार्‍या सरकारला शेतकर्‍यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवाल करून उपाध्ये म्हणाले की, 13 ऑक्टोबरला ठाकरे सरकारने शेतकर्‍यांसाठी 10 हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा केला, मात्र अजूनही त्यापैकी एक पैसाही शेतकर्‍यापर्यंत पोहचलेला नाही. केवळ संकटग्रस्त भागांचे दौरे करणे आणि मदतीच्या घोषणा करणे यात काही अर्थ नाही, असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यांना आपल्या या वाक्याची आठवण असेल व थोडीशी जरी लाज असेल, तर त्यांनी शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीमधून किती शेतकर्‍यांना लाभ झाला, कोणाकडे पैसा पोहचला, याचा संपूर्ण राज्याचा तपशील जनतेसमोर उघड करावा.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply