पेण : प्रतिनिधी
तालुक्यात खरीप हंगामातील भाताची कापणी करण्यास सुरुवात झाली असून, पेण तालुक्यात अद्याप आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. बाजारात भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पेण तालुक्यातील शेतकरी करीत आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या भात पिकाची कापणी सुरू झाली असूनही पेणमध्ये भात खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकर्यांना खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत असून, याचा फायदा घेत व्यापारी कमी दरात भात खरेदी करून शेतकर्यांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे भात खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी पेण तालुक्यात लवकरात लवकर भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी होत आहे.