Breaking News

नेरळच्या डम्पिंग ग्राउंडमधून धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचे आजार, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार

नेरळमधील डम्पिंग ग्राउंड कचर्‍याने ओसंडून वाहत असून, येथील कचरा जळण्यात येत असल्याने सतत निघणार्‍या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायतने तयार केलेल्या नवीन कचरा डेपोमुळे त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, या डम्पिंग ग्राउंडकडे नेरळ ग्रामपंचायत दुर्लक्ष झाले असून, रायगड जिल्हा परिषदेची यंत्रणादेखील मूग गिळून गप्प आहे. त्याबद्दल नेरळमधील जागरूक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. नेरळच्या घनकचरा प्रकल्पाचे पाच वर्षापूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. नेरळ विकास प्राधिकरण या प्रकल्पासाठी निधी देणार होते, मात्र पाच वर्षात हा घनकचरा प्रकल्प साकारला नाही. मात्र नेरळ ग्रामपंचायतीकडून दोन नवीन कचरा डेपो मात्र तयार झाले आहेत. कर्जत-कल्याण राज्यमार्गाला लागून असलेल्या कचरा डेपोमधील कचरा रस्त्यावर येत आहे. या डेपोमध्ये कचरा वाहून नेणारी वाहने जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन कचरा डेपो विकसित केला आहे. या पावसाळ्यापासून नेरळ धरणाजवळ असलेल्या पुलाखाली दररोज कचरा टाकला जात आहे. त्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणे कठीण होऊन बसले आहे. पायवाटेने जाणारे आणि तेथे असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाकाला रुमाल किंवा मास्क लावूनच घाटावर उभे राहावे लागत आहे. या डेपोतील कचरा जाळण्यात येत असल्याने आता सतत धुराचे लोट बाहेर पडत असतात. त्यामुळे होणार्‍या वायू प्रदुषणाने नेरळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. धरणाच्या परिसरातील लोकांना दारे, खिडक्या बंद ठेवूनच राहावे लागते. मात्र त्याचे नेरळ ग्रामपंचायतीला सोयरसुतक नाही. कचर्‍यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतांना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची आहे. मात्र वायू प्रदूषण रोखण्याचे कोणतेही काम जिल्हा परिषद कडून होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply