सर्वसाधारण सभेत धक्कादायक कबुली; सदस्य हैराण
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती जागा आहेत याची माहिती खुद्द जिल्हा परिषदेकडेच नसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी (दि. 17) सर्वसाधारण सभेत समोर आली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
रायगड जि. प.ची सर्वसाधारण सभा बुधवारी ‘शिवतीर्थ’मधील कै. ना. ना. पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष योगीता पारधी होत्या. जि. प.च्या जागांवर होणार्या अतिक्रमणांचा मुद्दा या सभेत चर्चेला आला. या विषयावर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले.
जिल्हा परिषदेकडे त्यांच्या मालकीच्या जागांची माहितीच उपलब्ध नसल्याचे या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य संतापले. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जागांच्या माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे सांगितले. यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित केले जात असून त्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे असलेल्या जागा, ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांकडील जागांची माहिती एकत्रित संकलित केली जाणार आहे. हे सॉफ्टवेअर डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होईल. त्यानंतर अतिक्रमणे कुठे आणि किती प्रमाणात झाली असल्याचे समजू शकेल, असे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात आता हायमास्क दिवे बंद होणार आहे. या सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसविण्यात आलेल्या पथदिव्यांची जवळपास 192 कोटी रुपयांची वीज देयके थकली आहेत.
उमटे धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या धरणातून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. जर या धरणातून शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी या सभेत दिला. नैसर्गिक आपत्तीसाठी आलेला निधी जि. प.च्या विविध विभागांकडे वर्ग करून घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केली.
या सभेत कंत्राटी सफाई कामगार, स्वच्छता कर्मचारी आणि वाहनचालकांच्या थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सभांचे इतिवृत्त उशिरा मिळत असल्याबद्दल सदस्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.
कर्नाळा बँकेत खाते उघडणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा : अमित जाधव
कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा अर्बन बँकेत ज्या ग्रामपंचायतींनी खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीमधील नैना प्रकल्पात होत असलेली बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी जोरदार मागणी रायगड जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी या वेळी केली.
या सभेत भाजप प्रतोद अमित जाधव यांनी कर्नाळा बँकेत खाते खोलणार्या ग्रामपंचायतींचे पैसे अडकल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामपंचायतीचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत उघडावे असे शासनाचे आदेश आहेत. असे असताना पनवेल आणि उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा अर्बन बँकेत खाते उघडले. या ग्रामपंचायतींचे नऊ कोटी रुपये कर्नाळा
बँकेत अडकले आहेत.
त्याचा परिणाम ग्रामपंचायतींमधील विकासकामांवर होत आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाळा बँकेत खाते उघडले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
पनवेल, उरण व खालापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा अर्बन बँकेत खाती उघडली आहेत. त्यांचे पैसे अडकले आहेत. या सर्वांची चौकशी केली जात आहे. ज्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सभागृहात दिली.
पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायत नैना प्रकल्पामध्ये आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. बांधकामांना परवनगी नैना देते, पण येथील माजी सरपंचांनी बांधकामांना परवानगी दिली आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. या इमारतींमध्ये घर घेणारे लोक मध्यमवर्गीय आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक थांबविण्यासाठी जी बांधकामे उसर्ली ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहेत ती ताबडतोब थांबवावीत, अशी मागणीही अमित जाधव यांनी या वेळी केली.