Breaking News

मराठा समाजाची माफी मागून पुन्हा आरक्षण मिळवून द्या

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 22) केली.

ठाकरे सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकिरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप युती सरकारने 2018 साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी भाजप युती सरकारने सारथी संस्था स्थापन करून तरुण तरुणींना करिअरसाठी भरघोस मदत केली होती, पण ठाकरे सरकारने या संस्थेचे महत्त्व कमी केले आणि संस्थेच्या योजनांना कात्री लावली आहे. भाजप युती सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करून मराठा समाजातील तरूण तरुणींना भांडवल पुरवठा केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. आता ठाकरे सरकारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारही ठप्प झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, निर्वाह भत्ता, शिष्यवृत्ती अशा फडणवीस सरकारच्या योजनाही ठप्प झाल्या. ठाकरे सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून महाविकास आघाडीने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply