Breaking News

रालोआचे शक्तिप्रदर्शन

देशाच्या भवितव्यासाठी होणार्‍या लोकशाहीच्या उत्सवातील  पाचव्या टप्प्याचे वेध आता देशवासीयांना लागले आहेत. या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाले असून, शुक्रवारी त्यांनी वाराणसीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेले शक्तिप्रदर्शन निश्चितच विरोधकांना धडकी भरून टाकणारे ठरले आहे.

लोकसभेच्या महासंग्रामास आता खर्‍या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. तीन टप्पे पार पडल्यानंतर आता सार्‍यांनाच वेध लागलेत ते चौथ्या टप्प्यातील मतदानाचे. सोमवारी (दि. 29) देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान घेतले जाणार आहे.त्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा चौथा टप्पा सुरू असतानाच तिकडे उत्तरेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या टप्प्याची जोरदार सुरुवातही करून टाकली आहे. या टप्प्यासाठी मोदी हे वाराणसी मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यासाठी शुक्रवारी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज गंगामाईच्या साक्षीने सादर केला आहे. हा अर्ज दाखल करताना भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेत जोरदार शक्तिप्रदर्शनही करून फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिला आहे. या शक्तिप्रदर्शनासाठी भाजपने वाराणसीत मोदींचा भव्यदिव्य असा रोड शो आयोजित केला होता. या रोड शोची दखल दुनियाने घेतली. कारण हा रोड शो म्हणजे भाजपचे शक्तिप्रदर्शनच होते. या रोड शोमध्ये सहभागी झालेले नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले होते. त्यामुळे सारी वाराणसी मोदीमय झालेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. 2014 मधील निवडणुकीत त्यांनी वाराणसीत अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचा पराभव केला होता. तीन लाखांहून अधिक मतांनी मोदी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय रिंगणात उतरले आहेत. वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधात काँग्रेसने प्रियांका गांघी वाड्रा यांना उभे करण्याचा घाट घातला होता, पण मोदी लाटेपुढे आपला निभाव लागणार नाही याची मनोमन खात्री पटल्यामुळे प्रियांका यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीएतील सर्व घटकपक्षांचे नेते या वेळी आवर्जून उपस्थित होते. मोदींच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत एकजूट असल्याचे दाखवून दिले. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोदींनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. काही लोक असं वातावरण निर्माण करत आहेत की मोदी जिंकले आणि आता मतदान नाही केले तरी चालेल, पण कृपया असं करू नका. मतदान तुमचा अधिकार आहे आणि हा एक उत्सव आहे. जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांशी जोशपूर्ण भाषण करताना मोदींनी आपल्या स्वप्नातील भारताचे संकल्पचित्रच सादर केले. युवा मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन करीत सशक्त भारतासाठी युवाशक्ती किती प्रेरणादायी आहे हे दाखवून द्या, असेही आवाहन मोदींनी केले. मोदींच्या या रोड शोचा धसका विरोधकांनी घेतला हे निश्चित. त्यांना आता आपला पराभव समोर दिसू लागलाय, असेच म्हणावे लागेल.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply