खारघर : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा, फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करावी यासाठी रविवारी (दि. 14)खारघरमध्ये एस क्लासेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या वेळी एस क्लासेसचे संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले की, 2022 हे वर्ष आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहोत. दीडशे वर्षे गुलामीत असलेल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आपण आपले योगदान देऊ शकलो नाही याची खंत आपल्या सर्वांना आहे, परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रत्येक सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आज आपल्याला लाभत आहे ही सौभाग्याची बाब आहे.
आयोजित पदयात्रेमध्ये सेक्टर 12 मधील बियुडीपी सोसायटीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या पदयात्रेत सुमारे 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या पदयात्रेत माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी भाई बेरा, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, अध्यात्मिक सेलचे संयोजक नवलकुमार मोरे, प्रतिक सोसायटीचे अध्यक्ष सुरज शेलार, प्रदीप शेलार व दत्तात्रय राणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, माजी सैनिक संयोजक गझे सिंग शेरॉन, विपुल चौटलिया, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, लखवीर सिंग सैनी यांनी भेट दिली.