पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या मालमत्तांना कर माफ करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले आहे. पनवेल महापालिका 2016मध्ये स्थापन होऊन आता पनवेल महापालिकेस पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षांत पनवेलने नागरिकांना कोणत्याही प्रकारची मालमत्ता करांसदर्भात बिल अथवा नोटिसा दिल्या नव्हत्या, परंतु पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना सन 2016 पासून मालमत्ता कराची बिले पाठविण्यात आलेली आहेत. अचानकपणे एकदाच आलेला पाच वर्षांचा मालमत्ता कर हा नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड असल्याचे वाटते. त्याचबरोबर कोविड-19ची सद्यस्थिती पाहता नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या प्रतिकूल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पनवेल महापालिका हद्दीतील गोर-गरीब नागरिकांना ते भरण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. याच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई व ठाणे महापालिकेने 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या मालमत्तांचे कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिकेनेदेखील असा निर्णय घेतल्यास पनवेल महानगरपालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या मालमत्ता धारकांना व गोर-गरीब जनतेला दिलासा मिळेल. जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुदृढ नसलेल्या नागरिकांना त्यापासून नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. या विषयाचे महत्त्व लक्षात घेता पनवेल महापालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या मालमत्ताधारकांचे कर माफ करण्याकरिता आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.