नवी मुंबई : बातमीदार
मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून 26 डिसेंबरपासून रुग्णवाढीस सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 4) 1072 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आशा परिस्थितीत आयुक्त बांगर यांनी शहरातील सर्व कोविड सेंटर्स पुन्हा सुरू केले आहेत. कोविड सेंटर्स सुरू करताना त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत याकरिता वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करावा. मागील तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीच्या वेळी प्रतीक्षा यादीवर असणार्या उमेदवारांना पाचारण करावे, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आवश्यक औषध पुरवठाही तातडीने उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वॉररूममार्फत बेड्स उपलब्धता व रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी दुसर्या लाटेत अडचणीच्या स्थितीतही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली. हीच भूमिका कायम ठेवत वॉररूमही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे नियोजन
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने प्रतिदिन दोन टन क्षमतेचे 4 पीएसए ऑक्सिजन प्लान्ट वाशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, बेलापूर माता बाल रुग्णालय व सिडको कोविड सेंटर येथे उभारले आहेत. याशिवाय पालिकेकडे 200 ड्युरा सिलेंडर आहेत. त्याचप्रमाणे एकूण 93 केएल क्षमतेचे (103 मेट्रिक टन) पाच लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक उभारण्यात आलेले आहेत. हे ऑक्सिजन टँक भरून ठेवावेत, असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले, तसेच कोविड केअर सेंटर्समध्येही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विशेष कक्ष कार्यान्वित करण्याबाबत सूचना
सिडको कोविड सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे निर्माण करण्यात आलेला मुलांसाठीचा विशेष कक्ष सुरू करण्यासाठी तयारीत राहण्याचेही आयुक्तांनी सूचित केले. ओमायक्रॉन व्हेरिएंट संशयित रुग्णांना सिडको कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper