पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट
पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 29) परिमंडळ-2 परिक्षेत्रात होत असून त्याअंतर्गत निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आज विविध मतदान केंद्रांवर नेमणूक करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी रवाना होणार आहेत. त्यांना काल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी विशेष मार्गदर्शन केले.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी सर्व पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या, तसेच परिसराची पाहणी केली. मतदान कोठे व कशा प्रकारे आहे, बुथ संख्या, त्यासाठी लावण्यात आलेले पोलीस दल, मतदान केंद्र यांच्यासह इतर मतदानासंदर्भात त्यांनी या वेळी माहिती घेतली, तसेच आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमीप्रमाणे सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा -नवले
पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पनवेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, तसेच लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील व्हा आणि मतदानाद्वारे आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घ्या, तसेच मतदारांवर राजकीय पक्षांकडून दबाव टाकला जात असेल किंवा कोणताही अनुचित प्रकार घडत असेल, तर तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या उ-तखॠखङ या अॅपवर व्हिडीओ किंवा फोटो सेंड करा. मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी 1950 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी केले आहे.
तसेच परिमंडळ-2चे उपायुक्त अशोक दुधे यांनी मतदारांनी कोणाच्या दबावाखाली तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे सांगितले. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास 100 नंबर किंवा नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा, तसेच व्हॉट्सअॅप नंबर 9372419799 यावर आपली तक्रार करावी. आपले नाव गुप्त राखण्यात येईल व तक्रारीची शहानिशा करून कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.