छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. या संदर्भात आम्ही कार्यवाही पूर्ण केली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.६) व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, स्व.दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळावर उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या या स्मारकाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे, जिथे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड स्थित आहे. म्हणूनच या ठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक असावे, अशी आमची इच्छा होती. आता देश-विदेशातून या विमानतळावर येणाऱ्या आणि येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शिवरायांच्या या तेजस्वी रूपामधून अथांग प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा.लि.द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकामध्ये आठ फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर शिवरायांचा १२ फुटांचा कांस्य धातूचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील ‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’चे शिल्पकार नितीन गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबेमिश्रित कांस्य)मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.
सुमारे आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे तसेच विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी हे स्थान सांस्कृतिक महत्त्वाचे एक मुख्य केंद्र ठरणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper