सुमन कल्याणपूर म्हणताच हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना पटकन ही गाणी आठवणारच. ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे… चित्रपट जब जब फूल खिले (१९६५), आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे… चित्रपट ब्रह्मचारी (१९६८), तुमने पुकारा और हम चले आए… चित्रपट राजकुमार (१९६४), मेरे महबूब ना जा… चित्रपट नूर महल (१९६५), दिल एक मंदिर है… चित्रपट दिल एक मंदिर (१९६३), ठहरिए होश में आ लूं… चित्रपट मोहब्बत इसको कहते हैं (१९६५), छोड़ो कल की बातें… चित्रपट हम हिन्दुस्तानी (१९६०), हमने प्यार किया है… चित्रपट दूल्हा-दुल्हन (१९६४), ये किसने गीत छेड़ा… चित्रपट मेरी सूरत तेरी आँखें (१९६३), अजब है दास्तां तेरी ऐ जिंदगी… चित्रपट शराबी (१९६४).
सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली त्याची एक आठवण प्रसिद्ध आहे, ही १९५६ सालची गोष्ट आहे. पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भर दुपारी सुमन हेमाडी (हे सुमन कल्याणपूर यांचे पूर्वाश्रमीचे नाव) एका वडीलधारी व्यक्तीला घेऊन आवाजाची टेस्ट द्यायला आल्या होत्या. तेव्हा एका संगीत दिग्दर्शकाला गाणं गाऊन दाखवले, पण त्याने नापसंती दर्शवल्याने सुमनजी निराश झाल्या आणि अशातच उन्हामुळे व निराशेने घशाला कोरडं पडली म्हणून त्या सोबतच्या वृद्धाला घेऊन चहा प्यायला गेल्या असता त्यांचे कोंकणीतील बोलणं त्या कोंकणी चहावाल्याला लक्षात आले. त्याला एकूणच काय घडलं हे लक्षात येताच तो त्यांना संगीतकार वसंत पवार यांजकडे नेले. चहावाल्याचा वसंत पवार यांच्याशी चांगला परिचय होता. सुमन कल्याणपूर यांनी यावेळी गाऊन दाखवलेले भावगीत वसंतरावांना आवडले आणि विष्णूपंत चव्हाण, वामनराव कुलकर्णी व राजाभाऊ परांजपे यांच्याकडे सुमन कल्याणपूर यांची स्तुती करताना ही मुलगी म्हणजे जणू ‘प्रतिलता’ आहे असे म्हटले. तेव्हाच सुमन कल्याणपूर यांना ‘पसंत आहे मुलगी’ (१९५६) या चित्रपटासाठी पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या गायिका या कारकिर्दीला सुरुवात झाली.
सुमन कल्याणपूर यांना भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म २८ जानेवारी १९३८ रोजीचा. मराठी चित्रपटात सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी संगीतकार वसंत प्रभू यांनी ‘दिसतं तसं नसतं’ (१९५६) या चित्रपटासाठी संगीतकार वसंत प्रभू यांनी दिली आणि त्याच सुमारास ‘पसंत आहे मुलगी’ या चित्रपटासाठी आपण पार्श्वगायन केल्याचे एका मुलाखतीत सुमन कल्याणपूर यांनी म्हटले. ते गाणे होते, मानसपूजा करते शबरी’. चित्रपट संगीतात येण्यापूर्वी सुमन कल्याणपूर या पंडित नवरंग नागपूरकर, खाँसाहेब अब्दुल रेहमान खाँ तसेच संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीत शिकत.
सुमन कल्याणपुर म्हटलं की त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वात जणू उतरले असे दिसे. निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा, तेवढाच मधुर आवाज आणि अनेक लोकप्रिय गाणी.. सुमन हेमाडी हे त्यांचे लग्नाआधीचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भावगीते तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर यांचे योगदान फार मोठे आहे. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी त्या काळातील आघाडीची म्युझिक कंपनी एचएमव्ही यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. हिंदीतील त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायचे, तर वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या “मंगु” ( १९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते “कोई पुकारे धीरे से तुझे”. गंमत म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार ओ. पी.नय्यर होते, पण हे एकच गाणे महम्मद शमी यांनी संगीतबद्ध केले होते. याचे कारण म्हणजे या एकाच गाण्यानंतर महम्मद शफी हे या चित्रपटापासून बाजूला झाले आणि ओ.पी. नय्यर यांच्याकडे हा चित्रपट आला तरी त्यांनी सुमन कल्याणपूर यांचे गाणे कायम ठेवले. त्यानंतर त्यांना जस जशी संधी मिळत गेली तशी त्यांनी त्या काळातील आघाडीच्या पार्श्वगायिका लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्यासह आपले स्थान निर्माण केले. ही खूप महत्त्वाची गोष्ट.
त्यांची काही लोकप्रिय मराठी गाणी सांगायची तर त्यात विविधता दिसते, “जिथे सागरा धरणी मिळते” असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, “घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात” असे म्हणणारी सासुरवाशीण, “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही” ही अंगाई, “कशी गवळण राधा बावरली” ही गवळण, “सांज आली दुरातुनी, क्षीतिजाच्या गंधातुनी” हे विरहगीत, “नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे”, “केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर” हे भावगीत, “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा”, “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे”, “देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा” सारखी भक्तीगीते, “उठा उठा चिऊताई”, “या लाडक्या मुलांनो या”सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता, तर काही मराठी चित्रपट गीते सांगायची तर, माहेरच्या अंगणात येतील (सुखाचे सोबती), अरे संसार संसार (मानिनी), रसिका प्रियतमा वेड लाविलेस का? (प्रीती विवाह), उजाड झाला बाग सखे ग उजाड झाला (माझा होशील का?), लावण्याने लाजून जावे (सुभद्राहरण), नको वाजवूस पावा (काय हो चमत्कार), आम्ही इंद्राच्या वारांगना (सवाल माझा ऐका) अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. सुखाची सावली आणि वावटळ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना राज्य शासनाच्या वतीने लता मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही गाणी त्या काळात आकाशवाणी, ग्रामोफोन, लाऊडस्पीकर अशी मोजकीच माध्यमे असूनही लोकप्रिय झालीत याचाच अर्थ ती गाणीच सकस व दर्जेदार आहेत, पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी ही लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो अशी खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.
सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. यशवंत देव यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील सुमन कल्याणपूर यांची गाणी सांगायची तर, ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही आहेत. सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे. एकूण तेरा भाषांमध्ये त्यांनी ३५०० गाणी गायली. अगर तेरी जलवा नुमाई न होती खुदा जाने तुमसे मुहब्बत न होती (बेटी बेटे), “न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया”, (बात एक रातकी), “ठहरीए होश मै आऊ, तो चले जाईएगा”, (मोहब्बत इसको कहते है), “तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैने करनी थी” (फर्ज), “परबतो के पेडो पर शाम का बसेरा है” (शगून) ,”अज हु ना आये बालमा” (सांज और संवेरा), “तुमने पुकारा और हम चले आये” (राजकुमार), “मेरे मेहबुब न जा” (नूर महल), “नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे” (जब जब फूल खिले),” आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर” (ब्रह्मचारी), “मेरा प्यार भी तू है”
( साथी), “दिल एक मंदिर है” (दिल एक मंदिर), “शराबी शराबी ये सावन का महिना” (नूरमहल), “आपसे हमको बिछडे हुए” (विश्वास), “चले जा चले जा… जहां प्यार मिले” (जहा प्यार मिले), “मन गाए वो तराना” (चालाक), “दिल ने फिर याद किया” (दिल ने फिर याद किया) या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. ही गाणी आज यू ट्यूबवर ऐकता पाहताना सुमन कल्याणपूर यांच्या पार्श्वगायनातील
अष्टपैलूत्व, खोली, विविधता कौतुकास्पद वाटते. मोनो रेकॉर्डिंगच्या काळातील अर्थात साठच्या दशकातील ही गाणी पन्नास वर्षांनंतरही आपला गोडवा आणि लोकप्रियता टिकवून आहेत. विशेष गाणे सांगायचे तर, संगीतकार नौशाद यांच्या ‘कातिल’ (१९६०) या चित्रपटातील फारुख कैसर यांनी लिहिलेले आणि मोहम्मद रफींसोबत गायलेले ‘सुनी किसीने बेकहे हमारी दास्ता, तडप के दिल ने कह दिया चुप रही जुबान’ याचा खास उल्लेख करायलाच हवा.
लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना सुमन कल्याणपूर यांनी एकदम गाणे गायचे सोडून दिले. ‘जिथे मन रमत नाही, जिथले व्यवहार मनाला रुचत नाहीत, जिथं उदासपण घेऊन रेंगाळण्यापेक्षा मी स्वेच्छेने पार्श्वगायन सोडलं, पण संगीताशी कधीही फारकत घेतली नाही,’ असे त्यांनी म्हटलं आहे. कालांतराने १९९४ साली कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अष्टविनायक’ या ध्वनीफितीव्दारे काही काळ पुनरागमन केले, पण तितकेच व तात्पुरते. २००९ साली त्यांचे ‘सुमन सुगंध’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याच्या निमित्ताने त्या आपल्या चाहत्यांसमोर आल्या आणि यानिमित्त त्यांनी काही मुलाखतीही दिल्या. त्याच सुमारास सुमन कल्याणपूर फॅन्स क्लबही स्थापन झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची वाटचाल सुरू असतानाच्या काळातच काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदींसोबत गाण्याचे सोडून दिल्याने लतादिदींची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या “चांद” (१९५९) ह्या हिंदी चित्रपटाकरिता एकत्र गायल्या होत्या. शैलेन्द्र यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल आहेत, कभी आज कभी कल कभी परसों ऐसी ही बीते… गायनाच्या पलिकडे जाऊन त्यांनी पेन्सिल स्केचेस, प्रोट्रेटस, निसर्गचित्र रेखाटणे, फोटोफ्रेम्स रंगवणे, स्वेटर शाली विणणे,
विविध प्रांतातील पाकसिध्दी करणे, प्रेस्टीज तसेच पाव बनवणे असे अनेक छंद जोपासत अनेक लहान लहान गोष्टीत आनंद घेत घेत वाटचाल करीत. देवपूजा या सगळ्यात महत्त्वाची मानत.
एक वेगळीच गोष्ट म्हणजे सुमन कल्याणपूर या यशवंत देव यांच्या शिष्य. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या ‘शुक्राची चांदणी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायल्या. त्या गाण्याचे बोल होते, प्रभू तुझ्या विश्वामध्ये… दुर्दैव म्हणजे हा चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणे रसिकांपर्यंत आलेच नाही. सुमन कल्याणपूर यांच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या गोष्टी घडतानाच असेही घडले. अर्थात, सुमन कल्याणपूर कायमच लक्षात राहतील हे वेगळे सांगायला नकोच!
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper