Breaking News

‌‘स्वर संध्या‌’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‌‘स्वर संध्या‌’ या सांगीतिक कार्यक्रमाने पनवेल परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. संगीत, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेल संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मैदानावर उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात झाला.
प्रारंभी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, हभप महादेवबुवा शाहबाजकर आणि ॲड. प्रसाद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संगीताच्या सुरेल मैफलीला प्रारंभ झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, रायगडभूषण पं. उमेश चौधरी, पं. तुषार चॅटर्जी, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, पूनम ठाकूर, वसंतबुवा पाटील, जे.टी. पाटील, मनोहर मसणे, संतोष पाटील, अशोक पाटील, विलास खानावकर, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, स्वप्नIल ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजकारण, शिक्षण, संस्कृती आणि लोकसेवा अशा क्षेत्रांत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‌‘स्वर संध्या‌’ हा त्याचाच एक भाग ठरला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या सारेगमप लिटल चॅम्प फेम गायिका अंजली गायकवाड आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांनी आपल्या सुमधुर आणि प्रभावी गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या भावगीत, भक्तिगीत, अभंग व लोकप्रिय गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पं.प्रतापबुवा पाटील यांची उत्कृष्ट मृदंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ तसेच सूर्यकांत सुर्वे यांचे तालवाद्य प्रभावी लाभले. या अनुभवी कलाकारांच्या समर्थ साथसंगतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक खुलला. स्वर आणि ताल यांचा अप्रतिम मिलाफ अनुभवताना रसिकांनी वारंवार दाद देत कलाकारांचा गौरव केला.
याशिवाय नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. गायिका शिवमाला पाटील यांनी ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण गायनातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. त्यांना पखवाजवादक निलेश पाटील आणि तबलावादक मिलिंद कडू यांची सुरेख साथ लाभली. भजनाच्या सादरीकरणादरम्यान सभागृहात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी आपल्या खास शैलीत केले. त्यांनी कलाकारांची ओळख करून देतानाच कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाचे वैशिष्ट्य रसिकांसमोर उलगडून सांगितले. या सांगीतिक कार्यक्रमाने संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या. दर्जेदार गायन, सुरेल वाद्यसंगत, भक्तिमय वातावरण आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‌‘स्वर संध्या‌’ हा कार्यक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षातील एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती तसेच रायगडभूषण पं. उमेश चौधरी, नादब्रह्म साधना मंडळचे अक्षय चौधरी, वैभव चौधरी यांनी मेहनत घेतली.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply