Breaking News

खारघरमध्ये अवतरले फ्लेमिंगो…

नवी मुंबई : बातमीदार

सुमारे 1,000 दिवसांनी फ्लेमिंगो खारघर पाणथळ क्षेत्रात परतल्याने पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वास्तू विहार सोसायटीनजीक असलेल्या पाणथळ जागेत हे फ्लेमिंगो आढळून आले. मुख्य म्हणजे संक्रांतीच्या दिनी खर्‍या खुर्‍या पतंगांचे दर्शन झाल्याचे उदगार पक्षीप्रेमींनी काढले.

फ्लेमिंगोंचा वावर मुंबई, ठाणे, ऐरोली, नेरूळ एनआरआय व टीएस चाणक्य तसेच उरण पाणजे येथील पाणथळ जागेत सातत्याने पाहण्यास मिळतो. या भागात दरवर्षी हजारोंच्या संख्येने हे पक्षी येत असतात. त्यांना पाहण्यास पक्षी अभ्यासक दूरवरून येत गर्दी करत असतात. कांदळवने व त्यात असलेली जैवविविधता. यात कांदळवनात सुरू असलेले जलचरांचे निसर्गचक्र कायम सुरू असते. हे जलचर म्हणजे फ्लेमिंगोंचे आवडते खाद्य म्हणून ओळखले जाते. त्यासाठी हमखास हे फ्लेमिंगो हजारो मौलांचा प्रवास करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई व उरण येथे असतात.

या भागात पक्षी पुन्हा परतून आल्याने निसर्गाकडून संक्रांत भेट मिळाल्याचा आनंद पक्षीप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. संक्रांतीला पतंगांऐवजी सुंदर पक्षी उडताना पाहिले, अशी प्रतिक्रिया सीमा टोंक आणि ज्योती नाडकर्णी यांनी दिली.

निसर्गाचा समतोल राखायचा असल्यास दलदलीचे प्रदेश, कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन केले पाहिजे. खारघर परिसरातील कांदळवने आणि दलदलीला नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार शासन आणि उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितिकडे याआधीच केली आहे. खारघर येथे फ्लेमिंगोचे झालेले दर्शन हा सुखद धक्का असून ही जैवविविधता टिकवणे व वाढवणे शासनाच्या हातात आहे.

-बी. एन. कुमार, पर्यावरणवादी, नेट कनेक्ट फाउंडेशन

खारघरमध्ये अगोदर कोल्ह्याची प्रजात गोल्डन जॅकलचे दर्शन घडले होते. निसर्ग आणि जैवविविधतेचा वारसा आहे. आपण त्याचा बचाव आणि संवर्धन केले पाहिजे तरच हे निसर्गाचे सुख आपल्याला व पुढच्या पिढीला अनुभवता येईल.अन्यथा हे पक्षी प्राणी पुढच्या पिढीला गुगलवर पाहावे लागतील अशी वेळ मानवाने आणू नये त्यासाठी शासनाने कायदे कठोर करावेत..

-तरंग सरीन, पक्षी व कीटक अभ्यासक

पर्यावरणवाद्यांची हाक मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावी

राज्याला मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांनी पर्यावरणवाद्यांची हाक गंभीर्याने घेणे गरजेचे आहे. नेरूळ, खारघर, उरण येथील पाणथळ जागा वाचवण्यासाठी पर्यावरणवादी आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी सांगितले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply