नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि भारतीय वशांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून खास शुभेच्छा दिल्या आहेत. जो बायडन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल. मोदींनी बायडन यांच्याशी गळाभेट घेतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचेही अभिनंदन केले आहे. तुमचे यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे; तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की, भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.