नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक निर्णय घेत नवी मुंबईतील गावठाणांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे सूचित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच मे. टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंट अॅण्ड सर्व्हिस प्रोवायडर्स एजन्सीला आदेश देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना सांगितले. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. सिटी सर्वेक्षणास शिदोरे अॅण्ड शिदोरे कंपनीमार्फत बेलापूर गावातून सुरुवात करण्यात आली होती. अर्धेअधिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव हे सर्वेक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मे. टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंस अॅण्ड सर्व्हिस प्रोवायडर्स या एजन्सीमार्फत 7 मार्च 2020पासून दिवाळे, सारसोळे व सानपाडा या गावठाण क्षेत्रातून सिटी सर्वेक्षण सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही आजपर्यंत त्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा केला असता कोरोना लॉकडाऊनमुळे सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ न शकल्याचे समजले, परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाचे सर्व नियम पाळून सिटीसर्वेक्षण सुरू करण्यास हरकत नसल्याने पुढील कार्यवाही केल्यास उचित होणार आहे. ग्रामस्थांमध्येही याबाबत संभ्रम निर्माण होत असून या सिटी
सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात करून त्यांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड दिल्यास खर्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. म्हणून नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी नगरसेवक सुनील पाटील उपस्थित होते.
‘…अन्यथा भूमिपुत्रांचे प्रश्न कधीच सुटणार नाही’
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या विस्तारित गावठणाचा प्रश्न कायम आहे. विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण करण्यासठी मी कायम पाठपुरावा करत आले आहे. हा विषय पटलावरदेखील मी आणला आहे. त्यास यश येऊन लाखो भूमिपुत्रांना त्याचा फायदा होणार आहे. विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण होऊन भूमिपुत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळून ते जागेचे मालक होणार आहेत. मध्यंतरी हे सर्वेक्षण सुरू झाले होते, मात्र त्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले होते. त्यामुळे ते बंद पाडण्यात आले. सर्वेक्षण झाल्याशिवाय भूमिपुत्रांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. त्यामुळे दिशाभूल करणार्यांपासून भूमिपुत्रांनी सावध राहावे, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी आवाहन केले आहे.