खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मास्को गेट ते सुभाषनगर या मार्गाला तसेच चौकाला स्वर्गीय सखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मस्को गेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी खोपोली नगरपालिका हद्दीतील सुभाषनगर येथील ग्रामस्थांनी यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. त्यापैकी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले, त्याबद्दल ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले पण नामकरणाचा मुद्दा अनिर्णित होता. त्याबाबत खोपोली पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे सोशल मीडिया सेल कार्यकर्ते व ग्रामस्थ राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दूरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन स्वीकारून कार्यवाही करू असे आश्वासन मुख्याधिकारी दूरे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या शिष्टमंडळात फरीद शेख, किशोर पुजारी, समीर गायकवाड, के. कांबळे, गोपाळ बावस्कर इत्यादीचा समावेश होता.