Breaking News

व्यावसायिकाची फसवणूक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर

चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघरमधील एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळून  धमकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रियंका (सीमा) काळेल असे या महिलेचे नाव असून तिने अजित पवार चुलत सासरे असल्याचे आणि डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचीदेखील थाप मारल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

तक्रारदार श्रीकृष्ण गोसावी पुण्यात राहण्यास असून त्यांची डिसेंबर 2020मध्ये त्यांची प्रियंका काळेल हिच्यासोबत खारघरमधील लॅन्डमार्क बिल्डींगमध्ये ओळख झाली होती. त्या वेळी प्रियंकाने ती फिल्म प्रॉडक्शनचे काम करीत असल्याचे सांगितले होते. गोसावी यांनी त्यांच्या 13 वर्षीय मुलीला चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितलेे. त्यानंतर प्रियंका काळेल हिने सिनेमात काम देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मुलीचे फोटोग्राफ आणि व्हिडीओ पाठवून देण्यास सांगितले होते.

प्रियंका हिने अजित पवार तिचे मावस सासरे, तर डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचे सांगून गोसावी यांच्यावर छाप पाडली होती. काही दिवसानंतर प्रियंका काळेल हिने गोसावी यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. गोसावी यांनी प्रियांकाला दोन लाख रुपये दिले.

गोसावी यांनी 10 दिवसानंतर प्रियंकाला फोन करून आपल्या पैशांची मागणी केली असता, तिने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. ती फसवणूक करीत असल्याचा संशय त्यांना आला. प्रियंका काळेल हिने गोसावी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून आत्महत्या व ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. त्यानंतर गोसावी यांनी प्रियंकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या महिलेविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply