श्रीलंकेविरुद्ध मायदेशी होणार्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यामुळे आता टी-20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारांत रोहित नवा ‘किंग’ असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे मुंबईकर खेळाडू रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी रोहितकडे हाही मूकुट येणार होता, पण द. आफ्रिका दौर्यात रोहित फिट नसल्याने केएल राहुलकडे ही जबाबदारी देण्यात आली होती, परंतु आता रोहित कसोटीचाही पूर्णवेळ कर्णधार असणार आहे. याबाबत बोलताना निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी, रोहित हा कसोटी कर्णधारपदासाठी एकमेव पर्याय होता. जुन्या आणि नव्या खेळाडूंची एकत्रित मोट बांधण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे रोहितकडे तिन्ही प्रकारांचे नेतृत्व आता असेल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे केएल राहुल, जसप्रीत बुमरा आणि ऋषभ पंत या तिघांना कर्णधारपदाचे पर्याय म्हणून विकसित केले जाणार आहे, असे सुतोवाच केले. रोहितने जेव्हा जेव्हा कर्णधारपदाची संधी मिळाली तेव्हा निवड समितीचा विश्वास सार्थ ठरविलेला आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा रोहित कर्णधार म्हणून मात्र शांत, संयमी असतो. विराट कोहलीच्या अगदी विरुद्ध त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतानाही आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. इतर अनुभवी खेळाडूंचा फॉर्म खराब असल्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाची माळही रोहितच्या गळ्यात पडणार असे मानले जात होते आणि झालेही तसेच. आता रोहितसमोर वरिष्ठ आणि नवोदित खेळाडूंचे संतुलन राखण्याचे आव्हान असेल. श्रीलंका संघ तुल्यबळ नसला तरी मागील वेळी याच संघाने भारतीय संघाला घाम फोडला होता. त्याचे उट्टे फेडण्याची चांगली संधी आगामी मालिकेत ‘रोहितसेने’ला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. याआधी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका दौर्यावरील वनडे मालिकेत बुमराहने उपकर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे एकाच वेळी मुंबईकर खेळाडू आता कर्णधार, उपकर्णधारपदी असतील. निवड समितीने खराब फॉर्ममुळे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासह वृद्धिमान साहा, इशांत शर्मा या चौघांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्याचवेळी प्रियांक पांचाळ, केएस भरत, सौरभ कुमार या नव्या चेहर्यांना कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. एक अष्टपैलू शार्दुल ठाकूरला श्रीलंका दौर्यात पूर्णपणे विश्रांती देण्यात आली असून दुसरा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. अशा प्रकारे भारतीय संघात संक्रमण पहावयास मिळत आहे. कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना रोहितला आपल्या फलंदाजीतही चमक दाखवणे आवश्यक आहे. अनेकदा तो आळसावलेला वाटतो. त्याला स्वत:मध्ये बदल करावा लागेल. आगामी संघबांधणीसाठी तो कशा प्रकारे खेळाडू हाताळतो यावर त्याच्यासह संघाचे भवितव्य ठरणार आहे.