अलिबाग ः प्रतिनिधी
देशात राष्ट्रीय एकतेचा विचार वाढल्याशिवाय प्रांतवाद मिटणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्रमार्फत दिल्या जाणार्या श्री गुरुजी पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 20) अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. जीवन विद्यामिशनचे प्रल्हाद पै सोहळ्याला उपस्थित होते. धर्मसंस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ऑल बाथो महासभा आसामचे गणेश दैमारी आणि शिक्षण व अनुसंधान क्षेत्रासाठी इंदूमती काटदरे यांना श्री गुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भाषावार प्रांतरचना करण्याचा धोका गोळवलकर गुरुजींनी स्वातंत्र्यानंतर व्यक्त केला होता. त्या वेळी त्यांच्या सूचनेकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्याचे परिणाम आज देशात पहायला मिळत आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एकच भाषा असूनही एकत्र राहू शकलेले नाही. प्रांतवाद वाढत आहे. कधी नद्यांच्या पाण्यावरून, कधी सीमा प्रश्नांवरून राज्ये भांडत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार वाढल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, असे भय्याजी जोशी म्हणाले. भारतीय संस्कृतीत विश्वशांती निर्माण करण्याची ताकद आहे, पण धर्म संस्कृतीपासून तरुण पिढी लांब जात आहे. याबाबत तरुणांमध्ये अज्ञान आहे. ते दूर करणे गरजेचे आहे, कारण सुसंस्कृत पिढी ही देशाला महासत्ता बनवेल. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण चुकीचे. एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही. सर्व सुखी व्हावे हेच आपले ध्येय असले पाहिजे. विचार परिवर्तन करून तरुण पिढी घडवायला हवी, असे प्रल्हाद पै म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र साताळकर यांनी केले, तर रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.