भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई ः बातमीदार
ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने सूचना मान्य करीत वयोमर्यादेत वाढ केली आहे.
आजपर्यंत वय वर्ष तीन असणार्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज दिले जात होते. बाकी पालकांना वयाच्या अटीमध्ये बसत नसल्याने साधा अर्ज स्वीकारून पाठविले जात होते. त्यामुळे बर्याच पालकांची निराशा झाली होती. याबाबत शिक्षण उपायुक्तांना विशाल डोळस यांनी भेटून शासन निर्णय 19 जानेवारी 2023 नुसार ज्या बालकांचे किमान वय तीन वर्ष व जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार पालिकेने पत्र काढून या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेक गरजू नागरिकांचे सीबीएसई शाळेत प्रवेश घ्यायचे स्वप्न पूर्ण होणार आहे.