धाटाव, रोहा ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धाटाव येथील औद्योगिक क्षेत्रातील रंग तयार करणार्या नामवंत सुदर्शन केमिकल्स कंपनीतील एका प्लांटला बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की रात्री संपूर्ण परिसर आगीच्या तांडवामुळे प्रकाशमय दिसत होता. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सुदर्शन केमिकल्स कंपनीतील आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीची कोट्यवधींची वित्तहानी झाल्याचे समजते.
सुरुवातीला हादरा बसल्याने स्फोटाची भीती व्यक्त केली जात होती. आग लागल्यानंतर महसूल प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली.
रोहा नगरपालिका, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्यावर सुमारे तासाभरात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कंपनीतील उपाययोजना, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या दुर्घटनेची सेफ्टी विभागाकडून सखोल चौकशी केल्यानंतर आगीचे नेमके कारण समजू शकेल.
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये पिगमेंटचे उत्पादन होते. जिथे आग लागली, त्या प्लांटमध्ये यलो कलर पिगमेंट तयार होते. हे उत्पादन पेंट तयार करण्यासाठी वापरले जाते. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायन नव्हते. तसेच शिफ्ट चेंज होण्याची वेळ असल्याने या ठिकाणी कोणीही कामगार नव्हते.
दरम्यान, सुदर्शन कंपनीत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या एक-दोन वर्षांत तीन ते चार वेळा आग लागल्याचे समोर आले आहे, मात्र कंपनी प्रशासनाकडून आतापर्यंत आजूबाजूच्या गावकर्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही, असा आरोप सुदर्शन कंपनीशेजारी असलेल्या बारसोली ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीत एखादी दुर्घटना घडल्यास सायरन वाजवून गावकर्यांना सावध राहण्याचा इशार दिला जावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper