आमचे हिंदुत्व म्हणजे सुडाचे राजकारण नव्हे अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधकांशी सुडाचे राजकारण करत असून हा सुडाचा प्रवास थांबवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनीच व्यक्त केली होती. तथापि, सुडाचे राजकारण नेमके कोण करते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सोमवारी कळून चुकले असेल.
सोमवारचा दिवस उजाडता उजाडताच मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर वाजतगाजत पोहचला. राणे यांच्या या बहुमजली इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आल्याचा पालिका अधिकार्यांचा दावा आहे. त्याचवेळेला राणे यांच्या मालवणनजीक चिवला बीच येथील निलरत्न या बंगल्याच्या बांधकामातही किनारपट्टी संरक्षक कायद्याचे उल्लंघन झाल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली. याच्या एकच दिवस आधी राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले होते. राणे यांचा तोफखाना धडाडल्यानंतर सत्ताधार्यांना ताबडतोब जाग आली आणि त्यांनी राणे यांच्या दोन्ही बंगल्यांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या. वर्षभरापूर्वी कंगना रणौत या अभिनेत्रीने महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर लगेचच तिच्या कार्यालयवजा बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. मुंबई महापालिकेने आकसाने ही कारवाई केल्याचे निरीक्षण न्यायालयाने तेव्हाच नोंदवले होते. असली किरकोळ शुक्लकाष्ठे राणे यांच्या मागे लावून काहीही साध्य होणार नाही हे आधी सत्ताधार्यांनी लक्षात घ्यायला हवे. महापालिकेमध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करण्यासाठी अगदीच कमी दिवस उरले आहेत. लवकरच महापालिकेवर प्रशासक येईल आणि शिवसेनेची राजवट संपेल. त्याआधी जमेल तितके राजकारण सत्ताधार्यांना करून घ्यायचे आहे असे दिसते. जुहू येथील आपल्या बंगल्यामध्ये एक इंचदेखील अनधिकृत बांधकाम झालेले नाही, अशी ग्वाही खुद्द राणे यांनीच दिली आहे. उलट ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या मातोश्री-2 या बंगल्यातील बेकायदा बांधकामे पैसे देऊन नियमित करून घेण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. या बंगल्याला परवाने कसे मिळाले त्याचीही माहिती आमच्याकडे आहे असे ते म्हणाले. मातोश्री-2 या बंगल्याचे बांधकाम गेल्या युती सरकारच्या काळातच झाले होते, तर राणे यांच्या अधीश बंगल्याचे बांधकाम बरीच वर्षे चालले होते. खुद्द माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनादेखील आपण नव्या घराबद्दल सांगितले होते व त्यांचे आशीर्वाद घेतले होते असे राणे यांनी सांगितले आहे. खुद्द बाळासाहेबांनी आशीर्वाद दिलेल्या बांधकामावरच त्यांच्याच संघटनेचे नेते हातोडा चालवत आहेत याला काळाचा महिमा म्हणावे की बदललेले राजकारण हे ज्याचे त्याने ठरवावे. एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे राजकारण आता नेत्यांच्या घरापर्यंत पोहचू लागले आहे असे दिसते. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राजकारणामध्ये नेहमीच शुचिता पाळत आले आहेत. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवणच आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये मात्र वैयक्तिक द्वेषापोटी गलिच्छ टीका करण्याचा प्रघात सत्ताधारी आघाडीतील नेते पाडत आहेत. हे गढुळलेले वातावरण पंतप्रधान मोदी किंवा भाजपने निर्माण केलेले नाही. किंबहुना सर्वाधिक निंदानालस्ती त्यांच्याच वाट्याला येते. हे सारे लवकरात लवकर थांबले पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राची जनता योग्य वेळी आपल्या मतांच्या भाषेतून चांगलेच सुनावेल.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …