गेल्या दहा वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग सुरू आहेत. मोरगिरी, रानबाजिरे, पैठण, चाळीचा कोंड तसेच तालुक्याच्या विविध भागातील अनेक प्रयोगशील शेतकरी दरवर्षी दिवाळीपासूनच स्ट्रॉबेरी लागवड करीत होते. पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाजवळ होऊ घातलेल्या स्ट्रॉबेरी फार्महाऊसमध्ये स्ट्रॉबेरी न पिकताच मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकार्यांना उत्पन्न मिळाले आणि शासनाची रॉयल्टी बुडविणार्यास शासनाकडूनच अभय दिले जाण्याचा प्रकार घडला. मात्र, स्थानिक प्रामाणिक शेतकरी तसेच प्रयोगशील शेतकरी सातत्याने हिवाळ्यातील थंड हवामानाचा तसेच ऑक्टोबर हिटदरम्यान सकाळी सुरू असलेल्या थंडीचा स्ट्रॉबेरी शेतीसाठी उपयोग करीत असल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टी व भुस्खलनानंतर शेतकर्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात स्वारस्य न राहिल्याने महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरीची आयात पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत होत आहे.
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी, हिवाळ्यात कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असे तीनही ॠतू कमालीचे तीव्र स्वरूपात अनुभवावे लागतात. यामुळे प्रयोगशील शेतकर्यांना शेंगदाणा, हळद, बटाटे, कांदे अशी अपारंपरिक पिके घेण्यास संधी मिळते. मात्र, ही संधी यशस्वी करणारे शेतकरी या पिकांच्या उत्पादनात सातत्य ठेवत नसल्याचा अनुभव तालुक्यातील कृषी पर्यवेक्षकांना येत आहे. काही वर्षांपूर्वी मोरगिरी येथील एका प्रयोगशील शेतकर्याने दीड-दोन एकर शेतजमीनीवर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी केली. मात्र, बाजारातील मागणी आणि महाबळेश्वर, पांचगणीच्या स्ट्रॉबेरी उत्पादनाशी स्पर्धा यामुळे त्या शेतकर्याला स्ट्रॉबेरी लागवडीचे सातत्य टिकविता आले नाही.
सध्या दरवर्षीप्रमाणे पोलादपूर एसटी स्थानक आणि जुन्या पोलीस स्टेशनच्या परिसरातील मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत रोज सकाळी महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी रसरशीत लालचूटूक स्ट्रॉबेरी टोपल्यांमधून विकण्यासाठी घेऊन बसत आहेत. सध्या प्रतिकिलो 100 रूपये असा स्ट्रॉबेरीचा दर आहे. स्ट्रॉबेरीचे फळ काहीसे आंबट असल्याने ग्राहकांकडून केवळ हौशीपोटी खरेदी केली जात आहे. शिमग्यापूर्वी या फळाची गोडी अवीट होऊन उत्पादन वाढल्याने दरही कमी होत असल्याने या शेतकर्यांना सध्या केवळ बाजारपेठ व मागणी टिकवून ठेवण्यासोबत रोज उपलब्ध होणारी स्ट्रॉबेरीची फळे नासून जाण्यापूर्वी विकून प्रवासभाडे व चरितार्थ चालविण्यापुरती कमाई करण्यासाठीच धडपड करावी लागत आहे. दिवसभर विक्रीसाठी बसणे शक्य नसलेल्या काही शेतकर्यांकडून कुंभळवणे येथील रवींद्र महाडीक यांनीही स्ट्रॉबेरी विकत घेऊन त्यांच्या पानाच्या टपरीसोबत स्ट्रॉबेरी विक्रीचा प्रयत्न चालविला आहे. सध्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर केवळ पोलादपूर येथेच अशी रसरशीत लालचूटूक स्ट्रॉबेरी विक्रीस उपलब्ध असल्याने कोकणात जाणारे चाकरमानी आवर्जून आपल्या गाड्या येथे थांबवून स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील चाळीचा कोंड रस्त्याच्या बाजूला बोरज गावाच्या हद्दीत प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदम यांच्या पेरूच्या शेतात गेल्या जुलैमध्ये ढवळी, कामथी आणि सावित्री नद्यांच्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले होते. त्यात बहुतांशी पेरूची झाडे वाहून गेली. या फटक्यातून सावरण्यासाठी शेतकरी रामचंद्र कदम यांनी चक्क महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपं आणून शेती करण्याचा निर्णय घेतला. कोकणातील हवामानात स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होत नसल्याचा अनुभव असताना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणार्या कदम यांचे हे धाडस अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. त्यांनी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपं आणून बोरज गावातील त्यांच्या शेतात पिक घेण्याचे ठरविले. एन्टर आणि नॉबिली अशा दोन जातीच्या स्ट्रॉबेरीची रोपं चांगले उत्पादन देतात अशी माहिती मिळाल्याने त्यांनी या दोन्ही जातीची प्रत्येकी पाच हजार रोपं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सातारा जिल्ह्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर भागातही यंदा पावसाने जोर धरल्याने रोपांचे भावही वाढले होते. तरीही वाढीव भाव देऊन कदम यांनी रोपं खरेदी करून गावाकडील शेतात आणली आणि लागवड केली. यावेळी अनेक रोपं मेली, मोडली. तरीही नुकसान होवो अथवा फायदा पण समाधान मिळाले पाहिजे तर मेहनत आणि चिकाटी बाळगलीच पाहिजे, या निर्धाराने कदम यांनी उत्तम मशागत करून पावसापासून आणि उन्हापासून रोपं वाचवित तसेच हवेतील गारवा टिकवित पिकाची जोपासना केली.
रामचंद्र कदम यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेल्या जमिनीतील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या दोन्ही बाजूंनी लसूणही लावले. या सर्व पिकांची देखभाल करण्यासाठी रामचंद्र कदम सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतावरच तळ ठोकून राहिले. रोपांना फळं लागली, पण हिरवी, पांढरी आणि काहीशी निस्तेज गुलाबी. हे पाहून बुचकळ्यात पडलेल्या शेतकरी कदम यांना वाईतील एका अनुभवी शेतकर्यांने मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली.
त्यानुसार रोपांची काळजी घेतल्यानंतर त्याच फळांनी केवळ तीन महिन्यात लालचुटूक माणिक रत्नासारखं रूपडं धारणं केले. सर्व रोपांना स्ट्रॉबेरी लागलीच पण या स्ट्राँबेरीची आंबटगोड चवही अवीट असल्याचे अनेकांचे म्हणणे झाले आहे.
मोठ्या प्रमाणात होत आहे खरेदी
आंबा, पेरू, झेंडू, वांगी, पपई, केळी, गहू अशी अनेक पिके घेऊन आता स्ट्रॉबेरीचा प्रयोग रामचंद्र कदम करीत असल्याने तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे सर्वच पर्यवेक्षक आणि सहाय्यक या स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करून कदम यांना मार्गदर्शन करू लागले. मात्र यंदा केवळ महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरीची आयात पोलादपूरच्या महामार्गालगत होत असून, ग्राहकांकडून स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
-शैलेश पालकर, खबरबात