महापौरांचा अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण समितीची बैठक
पनवेल : प्रतिनिधी
महिलदिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच 5 मार्च रोजी खारघर येथे महिला बचत गट व वैयिक्तिक महिला उद्योजिकांच्या विविध वस्तूच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांचा अध्यक्षतेखाली महापौर दालनात बुधवारी (दि. 23) महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या वेळी महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष हर्षदा उपाध्याय, प्रभाग सभापती ‘अ’च्या सभापमी संजना कदम, नगरसेविका चारुशीला घरत, रूचिता लोंढ, संतोषी तुपे, मोनिका महानवर, राजश्री वावेकर, अनीता पाटील व महिला बालकल्याण समितीच्या सदस्या, प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या डॉ. नील, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 मार्च रोजी गर्भसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती महिलांची मोफत मधुमेह तपासणी, अनिमिया तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी होणार आहे. हा कार्यक्रम 1.30 ते 5.00 या वेळात आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. यासोबतच 5 ते 9 मार्चदरम्यान महिला बचत गट तसेच वैयक्तिक महिला उद्योजिकांच्या माध्यमातून विविध वस्तू विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. खारघर येथील सेक्टर 12 येथील प्लॉट नंबर 12च्या मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी इच्छुक महिलांनी 28 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कविता मोकल तसेच विनया म्हात्रे यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.