Breaking News

महाडमध्ये जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; 34 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे खाडी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्यावर गुरुवारी (दि. 31) रात्री 10.30च्या सुमारास गावातीलच एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सावंत जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी कोकरे गावातील 34 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील दाभोळ खलाटीवाडीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष आबाजी रामा नाडकर यांनी ग्रामस्थांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेचे आमंत्रण जि. प. सदस्य जितेंद्र सावंत यांनाही देण्यात आले होते. गावातील काही किरकोळ समस्या आणि वादावर या सभेत सविस्तर चर्चा करण्यात येऊन वाद मिटविण्यात आले. सभेचे कामकाज रात्री 10च्या सुमाराला संपविण्यात आल्यानंतर सावंत आपले नातेवाईक विजय विनायक सावंत, स्वराज मंगेश सावंत, निर्जता नितेश चिवीलकर यांच्याबरोबर महेंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून घरी जात होते. थोडे अंतर गेल्यावर अचानक त्यांच्या गाडीवर 30 ते 40 जणांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात स्वत: सावंत आणि त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक जखमी झाले. हल्लेखोरांनी गाडीचेदेखील नुकसान केले. सर्व हल्लेखोर कोकरे गावातील असून, आपल्यावर राजकीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचे सांवत यांनी म्हटले. या प्रकरणी सावंत यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 34 जणांवर भा. दं. वि. 341, 143, 147, 149, 323, 504, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply