अलिबाग : प्रतिनिधी
माणगाव येथील मेडिकल दुकानदारावरील गोळीबार हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सोमवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली.
मयूर सुरेश गवळी (21, शीळफाटा, मुंब्रा, ठाणे), अजय महादेव अवचार (20), राजेश विजय शेळके (22), नितीन शिरमाजी कांबळे (24, तिघेही नौसिल नाका, रबाळे, नवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार असून त्याचे नाव समजू शकलेले नाही. हे सर्व मूळचे परभणीचे रहिवाशी आहेत. नवी मुंबईत कामानिमित्ताने ते राहतात. यातील मयूर गवळी याची शुभम ग्यानचंद्र जयस्वाल (24, रा. माणगाव, रायगड) याच्या बहिणीबरोबर इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेम जमले, परंतु त्याला शुभम जयस्वालचा विरोध होता. त्याने आपल्या बहिणीचा फोन काढून घेतला होता.
शुभम जयस्वाल आणि फिर्यादी दीपक रामकिशोर यादव हे 12 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून दोन जण त्यांच्या जवळ आले आणि मागे बसलेल्या व्यक्तीने शुभमच्या पोटात पिस्तुलमधून गोळी झाडली होती. गोळी झाडून आरोपी पळून गेले. शुभम यात गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने गस्त घालणारी पोलिसांची गाडी त्या दिशेने जात होती. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे शुभमवर वेळेत उपचार होऊन त्याचे प्राण वाचले.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात सीसीटीव्ही फुटेज आले कामी आले. शुभम जयस्वालवर झालेल्या गोळीबाराचा तपास सुरू असताना एके दिवशी त्याचे वडील ग्यानचंद जयस्वाल यांना फोनवरून अज्ञाताने दोन दिवसांत दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली. नाहीतर तुझ्या परिवारास मुलाप्रमाणे ठार मारू अशी धमकी दिली. या प्रकरणीही गुन्हा दाखल झाला. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …