Breaking News

पनवेल तालुक्यात आंबा मोहरला

मार्चअखेरीस फळ बाजारात दाखल होण्याची शक्यता

पनवेल : वार्ताहर

तालुक्यात हळूहळू आंब्याच्या झाडांना मोहर लागल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पडलेल्या थंडीमुळे याठिकाणच्या हापूस, पायरी आंबा व इतर प्रजातीच्या बागा बर्‍यापैकी मोहरल्या आहेत.

बागा मोहरण्याने प्रमाण काही ठिकाणी 60 टक्के तर काही बागांमध्ये 80 ते 90 टक्क्यांपर्यंत आहे, परंतु काही भागांत थंडीच न जाणवल्याने आंबा बागा मोहरण्याची काही अंशी प्रतीक्षा आहे. ज्या बागा मोहरल्या त्या बागांमधील आंबा साधारणतः मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे यापुढील काळात मोहरणार्‍या आंबा बागांमधील आंबा लांबण्याची शक्यता शेतकरी व तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

पनवेल तालुक्यातील धोदाणी, गराडा, नानोशी, मालडुंगे, वाजे, वाकडी आदी ग्रामीण भागात व डोंगराळ परिसरात आंब्याचे पीक घेतले जाते. पनवेल तालुक्यात जवळपास 520 हेक्टर क्षेत्रात आंब्याचे पीक घेतले जाते. मागील काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका आंबा फळ झाडांना बसला आहे. तरीदेखील सद्यस्थितीत पनवेल तालुक्यातील आंब्याच्या फळबागांमध्ये झाडांवर मोहोर दिसून येत असल्याने आंबा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर व हवामानातील बदलानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने पनवेलमधील ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील डोंगराळ भागात नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे पीक घेतले जाते तर काही ठिकाणी खतांचाही पुरेसा वापर केला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्यावर्षी आंब्याचे पीक अपेक्षित असे आले नाही. परंतु मध्यंतरी पडलेल्या थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर मोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदा उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनची परिस्थिती, चक्रीवादळ, बदलते हवामान, अवकाळी पाऊस याप्रमाणे लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड गोड करण्याची चिन्हे दिसत आहेत.

या वर्षी आंबा उशिराने येणार असला तरीही सद्यपरिस्थिति झाडांवर उत्तम मोहर लागला असून काही ठिकाणी झाडांवर लहान कणी देखील तयार झाली आहे. पिकावर रोग किंवा अळी लागू नये यासाठी कीटकनाशके फवारणी सुरू केली आहे. गेल्यावर्षीच्या प्रमाणात यावर्षी चांगले पीक येण्याची शक्यता आहे. झाडांवर हिरवीगार लहान कणी आल्याने एकप्रकारे समाधानकारक परिस्थिती आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर यंदा चांगले पीक आल्यास शेतकर्‍यांना नक्कीच उभारी मिळेल.

-श्रावण भल्ला, नानोशी, आंबा उत्पादक

यावर्षी उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने आणि अद्यापही थंडीचे प्रमाण कमी असल्याने मोहोर फुटण्यास एक महिना उशिरा झाला. तालुक्यातील ग्रामीण भागात आंब्याचे चांगले पीक घेतले जाते. गेल्यावर्षी आंबा शेतकर्‍यांना फारसा नफा झाला नाही. पुढील काही दिवसांत आंब्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण राहिल्यास यावर्षी चांगले पीक येईल. सद्यपरिस्थितीत आंब्याच्या झाडांवर चांगला मोहोर दिसून येत असल्याने यंदा चांगले पीक येण्याची शक्यता आहे.

-ईश्वर चौधरी, कृषी अधिकारी, पनवेल

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply