अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यातील पाच प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांची पात्रं दुथडी भरून वाहू लागल्याने नदीपात्रातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल वाहून गेल्या. त्यापैकी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील एकमेव जुनी पाणीपुरवठा योजना वेळेवर निधी मिळूनही सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे.
राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे पोलादपूर तालुक्यातील नळपाणी योजनांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ‘पाणी मुरतंय‘, अशी परिस्थिती झाली आहे. उन्हाळयात पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत असताना अनेक योजनांची अवस्था खडखडाट अशीच आहे. जिल्हा परिषदेच्या पोलादपूर येथील बांधकाम विभागामध्ये काही काळ सुरू झालेले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पुन्हा महाड पंचायत समितीच्या आवारात नेण्यात आले आहे. त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबतच्या सरकारी अनास्थेमध्ये वाढ होऊन पाणीटंचाई निवारणाच्या कायमस्वरूपी प्रयत्नांना खीळ बसली आहे. दुसरीकडे अभियंत्यांच्या मते योजनांचा दरडोई खर्च मर्यादित असताना प्रत्यक्षात पाण्याचा उद्भव आणि योजनेतील अंतरामुळे दरडोई खर्च वाढत असल्याने मंजुरीस अडथळा येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील वाकण, नाणेघोळ, पितळवाडी, गोळेगणी, बोरघर, वडघर, कामथे, कुडपण बुद्रुक, कुडपण बुद्रुक मधलीवाडी, देवपूर, खडपी, गांजवणे, माटवण, कापडे बुद्रुक, बोरावळे, घागरकोंड, चाळीचा कोंड, महाळुंगे, लहुळसे, तुटवली, परसुले, पार्ले, वझरवाडी, ओंबळी, पैठण-पांगळोली, कोतवाल बुद्रुक, बोरघर उमरठ, काटेतळी, तुर्भे बुद्रुक, सडवली, चोळई, पळचिल, कोतवाल बुद्रुक, साखर खडकवाडी, आडावळे बुद्रुक, कोंढवी, धामणदिवी, भोगाव बुद्रुक, देवळे, करंजे, गोवेले, सडेकोंड, चांभारगणी बुद्रुक, गोवेले साळवेकोंड, गोवेले, सावंतकोंड-पार्टेकोंड, चरई, तुर्भे खुर्द, चांभारगणी बुद्रुक, आंग्रेकोंड, रानबाजिरे, तामसडे-मोरेवाडी, आडावळे, दिवील, मोरसडे, लोहारे, मोरगिरी, मोरगिरी फौजदारवाडी, कोतवाल खुर्द, कोतवाल खुर्द रेवाडी, ढवळे, खांडज, खोपड, केवनाळे, महालगूर, आडाचीवाडी, तुर्भेखोंडा व तुर्भेबुद्रुक अशा जुन्या नळपाणी योजना आहेत तर रानवडी, गुडेकरकोंड, कुडपणखुर्द, कातळी, भोगाव खुर्द, क्षेत्रपाळ, धारवली, निवे, दाभिळ, किनेश्वर अशा नवीन नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून प्रगतीपथावरील या योजना गेल्या काही वर्षांपासून कार्यान्वित होता होता 22 जुलै 2021च्या महापुरात वाहून गेल्या आहेत.
पोलादपूर शहरासाठी नवीन विस्तारित नळपाणी योजना ही प्रत्यक्षात दुरूस्तीअंतर्गत असून यासाठी 9.5 कि.मी. लांबीची पाईपलाईन आवश्यकता होती.त्यात 3.5 कि.मी. लांबीची जुनी आणि सहा कि.मी. नवीन पाईपलाईन वापरली जाणार होती. मात्र जलशुध्दीकरण प्रकल्पाअभावी 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या या पोलादपूर नवीन विस्तारित नळपाणी योजनेचे काम अद्याप रखडलेलेच आहे. जुन्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना 22 जुलै 2021 रोजी या योजनेची जॅकवेल वाहून गेली. या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र त्याचे श्रेय घेण्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले. प्रत्यक्षात 22 जुलै 2021 रोजीच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पोलादपूर तालुक्यातील इतर नळपाणी पुरवठा योजनांकडे दूर्लक्ष करण्यासाठीच हा वाद घातला जात होता, हे महाड, पोलादपूर, माणगांव तालुक्यातील जनतेला जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
-शैलेश पालकर, खबरबात