



अलिबाग : प्रतिनिधी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी (दि. 31) अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी होते. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग किनार्यावर प्रथम सर्वाना एकत्मतेची शपथ देण्यात आली. अभिनेते देवदत्त गजानन नागे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा वन अधिकारी मनिष कुमार, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा कारागृह अधिकारी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम आदी या वेळी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच अलिबाग पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, महसूल विभाग, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रातील पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक, अलिबाग शहरातील नागरिक, आरएसपीचे विद्यार्थी या एकता दौडमध्ये सहभागी झाले होते.