पनवेल ः रामप्रहर वृृत्त
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन 4 ते 6 मार्च दरम्यान शहरातील गुजराथी शाळा, डॉ. आंबेडकर रोड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेअंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल, काळा, जांभळा तांदूळ तसेच सुवासिक इंद्रायणी, बारीक जातीच्या वाडा कोलम, शुभांगी वायएसआर इ. तांदळाची थेट शेतकर्यांकडून योग्य दरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. रब्बी हंगामात उत्पादित कडधान्य तसेच भाजीपालाही थेट शेतकर्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेले विविध जातींचे तांदूळ, भाजीपाला, कंदमुळे, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विविध महिला बचतगटांची उत्पादने व त्यांचे प्रदर्शनही ग्राहकांसाठी या महोत्सवात प्रमुख आकर्षण असणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.