कर्मचार्यांसाठी विविध स्पर्धा
रसायनी ः प्रतिनिधी
पाताळगंगा एमआयडीसीमधील सिप्ला या औषध निर्माण करणार्या कारखान्यांमध्ये 4 मार्च रोजी 51 वा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने सर्व कर्मचार्यांनी कारखान्यातील अंतर्गत रस्त्यावर सुरक्षा जनजागृतीकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरक्षाविषयक घोषणा देण्यात आल्या.
या सप्ताहाचे उद्घाटन पाताळगंगा एमआयडीसी परिक्षेत्रामधील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी अंकुश खराडे यांच्या हस्ते करून झेंडावंदन करण्यात आले. तसेच उपस्थित कामगारांना सुरक्षितता शपथ आणि मार्गदर्शनपर उपदेश देण्यात आला. त्याचबरोबर कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्या विविध सुरक्षितता उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी सिप्ला कंपनीचे पाताळगंगा येथील साईट हेड पराग देशमुख, साईट सेफ्टी हेड निलेश पाटील आणि साईट एचआर हेड विनायक काळे व इतर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 ते 11 मार्चपर्यंत सप्ताह होणार साजरा
या सप्ताहामध्ये सुरक्षा घोषवाक्य स्पर्धा, सुरक्षा निबंध स्पर्धा, सुरक्षा चित्रकला स्पर्धा, चालता बोलता अशा विविध स्पर्धांचे आयोजन कारखान्यातील कर्मचार्यांकरिता केले असल्याचे निलेश पाटील यांनी सांगितले. 4 ते 11 मार्चपर्यंत सुरक्षितता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.