
कर्जत : बातमीदार
एसटीच्या कर्जत आगारातील आठ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवार (दि. 1) पासून बेमुदत उपोषण सुरू केले. एसटी आगराबाहेर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांची ठाणे येथील कामगार अधिकार्यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र सर्व उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
कर्जत एसटी आगारीतील आठ कर्मचार्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पेण रामवाडी येथील वाहतूक नियंत्रक कार्यालयाने त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले नाही. त्यामुळे त्या आठ कामगारांनी कर्जत एसटी आगाराबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आर. डी. आपुर्तीकर, गणेश चांदेकर, हुसेन गेडाम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून या उपोषणाला सुरुवात झाली. मात्र आचारसंहिता काळात उपोषण करता येत नसल्याने नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण स्थगित करण्याची सूचना केली. आचारसंहिता काळात उपोषण करणार्यांवर पोलीस कारवाई करू शकत असल्याची माहिती भालेराव यांनी उपोषणकर्त्यांना दिली.
ठाणे येथील कामगार अधिकारी पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदलीच्या ठिकाणी सर्व आठ कामगारांना सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आपल्याकडे कामगार कमी असल्याने रोज 10 कामगारांना डबल ड्युटी करावी लागते तसेच पेण रामवाडी कार्यालयाने सोडल्यानंतर तुम्ही बदलीच्या ठिकाणी जा, असे सांगून कर्जत आगार प्रमुख यादव यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र बुधवारी सायंकाळपर्यन्त उपोषण सुरूच होते.