खोपोलीत अॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा या पुस्तकाचे प्रकाशन
खोपोली : प्रतिनिधी
संधी मिळाली तर महिला संधीचे सोनं नक्कीच करतात, हे अॅड. मीनाताई बाम यांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन विहिंप नेते विनायकराव देशपांडे यांनी शनिवारी (दि. 5) खोपोली येथे केले.
विहिंप नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी खोपोलीतील ब्राह्मण सभा सभागृहात करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विनायकराव देशपांडे बोलत होते. आपण समाजासाठी देणं लागतो, या भावनेतून प्रत्येकाने आपले कार्य केले पाहिजे तर त्याच्या कामाचा समाजामध्ये सुगंध दरवळतो असे साप्ताहिक विवेकच्या उपसंपादक शीतल खोत यांनी सांगितले.
माणसे जोडणे, त्यांना समाजकार्याच्या प्रवाहात आणण्याचे काम मीनाताई आजही अव्याहतपणे करीत आहेत. त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आधारवड ठरल्या असल्याचे विहिंप धर्मजागरण प्रमुख दादा वेदक यांनी सांगितले. चिन्मय आश्रम चे स्वामी मेगजानंदजी यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर इत्यादींनी मीनाताईंच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
वाचन संस्कृती लोप पावत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून लेखिका अॅड. मिनाताई बाम यांनी वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मीनाताई यांचे बंधू दीपक बाम यांनी त्यांच्या काही ठळक आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले व अॅड. गायकवाड यांनी केले. भाजप नेते माजी आमदार देवेंद्र साटम, ज्येष्ठ कीर्तनकार रामदासमहाराज पाटील, अॅड. विजय पाटणकर, अॅड. अनंत नामजोशी, संतोष कोळंबे, राजदत्त झरकर, उल्हासराव देशमुख, पत्रकार रवींद्र घोडके, श्रीकांत पाटणकर, पेणच्या वासंती देव, दादा शिरोडकर, श्रीकांत काशीकर, बाबूजी नाटेकर, नरेंद्र हर्डीकर, अनिल रानडे, रा. स्व. संघाचे राकेश पाठक, अविनाश मोरे यांच्यासह विहिंप, रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आणि वकील या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. राजेंद्र येरुणकर यांनी आभार मानले.