Breaking News

म्हसळा आडी बंदर येथील झोपडीला आग

आदीवासी महिला भाजली

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यातील आडी बंदरवाडी येथील दिलावर यांच्या  आंबा बागायतीतील झोपडीला सायंकाळी आग लागली. यावेळी जळत्या झोपडीतील कपडे काढण्यासाठी गेलेली शैला विजय हिलम (वय 22) ही आदिवासी महिला सुमारे 70 टक्के भाजली.

विजय हिलम व त्याची पत्नी शैला हे आडी बंदर येथील दिलावर यांच्या आंबा बागायतीत कुटुंबासमवेत राखण करीत असतात. बागायतीत असणार्‍या झोपडीला सायंकाळी 4च्या दरम्यान आग लागली. 4 वर्षाच्या छोटया मुलीने बाहेरील विस्तव झोपडीत नेला, हे झाले आगीचे निमीत्त. आगीचे वृत्त कळताच शैला हिलम ही झोपडीजवळ आली. झोपडीत असलेले कपडे बाहेर काढण्याच्या नादात शैला आगीत भाजली. शैला हिलमची मान, हात, पोट व शरीराचा  अन्य भाग असे 70 टक्के शरीर भाजले असल्याचे ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. कत्पांत शुक्ल यानी सांगितले.

या घटनेचे वृत्त समजताच तालुका कार्यकारी दंडाधिकारी  रामदास झळके व एपीआय प्रविण कोल्हे यांनी शैलाची मृत्यूपूर्व जबानी नोंदविली. म्हसळा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास श्रीवर्धन पोलिसांकडे देण्यात येणार असल्याचे हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी सांगितले.

108 अ‍ॅबुलन्स नसल्याने शैला हिलम या जखमी महिलेची हेळसांड झाली. भाजलेल्या शैलाला मोटर सायकलने आड़ीवरून माहेरी कोळे येथे आणि तेथून म्हसळा ग्रामिण रुग्णालयात आणावे लागले. यात तब्बल 2 ते 2॥ तास गेले. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयातील तुटपुंज्या सुविधेमुळे डॉ. कत्पांत शुक्ल यांना तारेवरची कसरत करीत शैला हिच्यावर उपचार करावे लागले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply