खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांची ग्वाही; शेतकरी आणि कंपनी अधिकार्यांची बैठक
पेण : प्रतिनिधी
राज्यशासन शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, पेण तालुक्यातील चिर्बी, माचेला खारबंधिस्तीचे बळटीकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी (19 फेब्रुवारी) येथे दिली.
जेएसडब्ल्यू स्टिल कंपनी परिसरातील काराव व डोलवी ग्रामपंचायत क्षेत्रातील चिर्बी, माचेला, गडब, ढोबी येथील खारबंधिस्तीची दयनिय अवस्था झाल्यामुळे परिसरातील शेतजमीन नापिक होऊन संबंधित शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीने केलेल्या मातीच्या भरावामुळे शेतात पाणी तुंबते. या संदर्भात शेतकर्यांनी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने केली. याची दखल घेत राज्याचे खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनीत बाधित शेतकरी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या खारभूमी योजनेचे बळकटीकरण लवकर पूर्ण व्हावे, अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे ना. रावते यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
चिर्बी, माचेला खारबंधिस्तीच्या योजनेतील बंधार्याच्या बळकटीकरण कामाची निविदा काढण्यात आली आहे. यासाठी निधी मंजूर केला असून, बंधार्याच्या नुतनीकरणासाठी व बळकटीकरणासाठी जो मातीचा भराव करावा लागणार आहे, त्यांची ने-आण करण्यासाठी बंधार्यालगतच्या शेतकर्यांची थोडीसी जमिन रस्त्यासाठी लागणार आहे. त्यासाठी शेतकर्यांनी सहकार्य करावे. तसेच शेतीच्या नुकसानी बाबतचा प्रश्न कंपनी प्रशासनाने त्यांच्या स्तरावरून सोडवणे गरजेचे आहे, असे मंत्री महोदयांनी सांगितले.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या सभागृहात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, प्रांत अधिकारी प्रतिभा पुदलवाड, तहसिलदार अजय पाटणे, जेएसडब्ल्युचे प्रशासन अधिकारी नारायण बोलबंडा, आत्माराम बेटकेकर, विनय नेने, कुमार थत्ते, जि.प.विरोधी पक्षनेता सुरेंद्र म्हात्रे, खारभूमी अभियंता पी. ए. भदाणे, सहाय्यक अभियंता सोनल गायकवाड, काराव संरपच अर्पणा कोठेकर, ओमकार दानवे, तुलसीदास कोठेकर, तुकाराम म्हात्रे, श्रीतेज कदम, मिलिंद म्हात्रे, हिराजी चोघले, आशिश वर्तक आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.