मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सरकारला पाठिंबा देणारा एक घटक पक्ष असलेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टींनी आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी धोरण स्पष्ट केले. त्यामुळे यानंतर राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने ‘किमान समान कार्यक्रमावर’ ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
मी एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या 5 एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत राजू शेट्टींनी सूचक इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारपुढे अडचणींचा डोंगर येत असतानाच, आता राजू शेट्टी यांच्या वक्तव्यांमुळे त्यात भर पडली आहे.