खारघर : प्रतिनिधी : धोकादायक असल्याने सिडकोने कोपरा पूल वाहतुकीस बंद केला आहे, मात्र या निर्णयानंतर या ठिकाणी असलेल्या दुसर्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने एका बाजूने वाहन गेल्याशिवाय दुसर्या वाहनांना मार्गक्रमण करता येत नसल्याने सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात सेनेच्या विभागप्रमुख मनेश पाटील यांनी लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे पत्र सिडकोला दिले आहे. धोकादायक पूल बंद करण्यापूर्वी सिडकोने उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र कोणत्याही उपाययोजना न करता सिडकोने हा पूल वाहतुकीस बंद केल्याने या ठिकाणी तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक हिरानंदानी उड्डाणपूल व दुसरा कोपरा पूल पनवेल वरून आल्यावर थेट कोपरा पुलामार्गे खारघर शहरात प्रवेश करता येतो, मात्र सध्याच्या घडीला हा पूल बंद केल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोपरा पुलामार्गे सायन-पनवेल महामार्ग गाठणे या वाहतूक कोंडीमुळे अवघड झाले आहे. खारघरमधील नागरिकांना हिरानंदानी मार्गे वेढा घालून सायन पनवेल महामार्ग गाठावा लागत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे विभागप्रमुख मनेश पाटील यांनी सिडकोचे खारघरमधील अभियंता संजय पुदाळे यांना निवेदन देऊन यासंदर्भात उपाययोजना राबविण्याची विनंती केली आहे. कोपरा गावातील स्थानिक ग्रामस्थांना देखील या ठिकाणाच्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील रहिवासी गणेश तोडेकर यांनी सांगितले. सिडकोचे अधिकारी पुडाळे यांना निवेदन देतेवेळी सेनेचे मनेश पाटील यांच्यासोबत सतीश पाटील, पांडुरंग घुले, गजानन महाडिक, नवनाथ पाटील, जितेश भगत, प्रताप नावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …