खोपोली ः प्रतिनिधी
खोपोलीतील काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक, विद्यमान शहर अध्यक्ष व विद्यमान काँग्रेस कमिटीचे बहुतांश पदाधिकारी रविवारी (दि. 1) भाजपत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दाखल झाले. कर्जत-खालापूरचा आमदार भाजपचाच, असा निर्धार या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
या वेळी विद्यमान शहर अध्यक्ष संतोष खुरपुडे, युवक अध्यक्ष रॉबिन सॅम्युअल, उपाध्यक्ष सुबिन सॅम्युअल, युवक उपाध्यक्ष यबीन सॅम्युअल, खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष एम. आर. पांडे, माजी शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक मधुकर दळवी, माजी नगरसेवक व उपाध्यक्ष महादू जाधव, महिला शहर अध्यक्ष सलमा शेख, माजी महिला अध्यक्ष प्रमिला गायकवाड, उपाध्यक्ष मैन्यू शेख यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीतील काँग्रेस कमिटीचे बहुतांश पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी येणार्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघ भाजपला मिळण्याची पूर्ण खात्री असून माजी आमदार देवेंद्र साटम हे भाजपचे उमेदवार असतील. त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष व नगरसेवक बेबीशेठ सॅम्युअल, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील, वरिष्ठ नेते रोहिदास पाटील, रामकृष्ण तावडे, निवृत्ती पिंगळे, रामदास ठोंबरे, शरद कदम, शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, सूर्यकांत देशमुख, नगरसेवक तुकाराम साबळे, नगरसेविका जिनी सॅम्युअल, अपर्णा मोरे, मानसी काळोखे आदींसह भाजपचे खोपोली शहरातील सर्व पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सॅम्युअल यांच्या प्रवेशात तांत्रिक अडचण
हा संपूर्ण पक्षप्रवेश सोहळा व कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला ते माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बेबीशेठ सॅम्युअल व नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी मात्र आज भाजपत प्रवेश करण्याचे टाळले. यामागील कारण म्हणजे हे दोन्हीही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आल्याने व याबाबत भविष्यात तांत्रिक बाबी निर्माण होऊ नये म्हणून आज या दोघांनी भाजपत प्रवेश केला नाही. लवकरच या दोघांचा भाजपप्रवेश होईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले.