Breaking News

असहाय आघाडीची अवस्था

सुमारे 28 महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच झालेल्या नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धर्माची राजकारणाशी सांगड घालणे ही आमची मोठीच चूक होती, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले होते. एकप्रकारे शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यानंतरची जवळपास अडीच वर्षे शिवसेना हिंदुत्वापासून कोसो मैल दूर गेल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाची हाळी देणे शिवसेनेला भाग पडले आहे. यावेळी त्याला कारणीभूत ठरले आहेत ते एमआयएम या पक्षाचे सर्वेसर्वा असदउद्दीन ओवेसी. महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवण्यासाठी उतावीळ असलेल्या एमआयएमने अनपेक्षित खेळी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जी काही पळापळ झाली त्याने महाराष्ट्रातील मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना साथीला घेऊन उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे सत्ता राखण्याचे मनसुबे उधळून लावले. राजकारणामध्ये अशा प्रकारचे डावपेच नवे नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या जनतेचा कौल सपशेल धुडकावून लावत केवळ सत्तेसाठी शिवसेनेने केलेले हे राजकारण ना जनतेच्या पचनी पडले, ना भारतीय जनता पक्षाच्या. शिवसेना मुस्लिमधार्जिणी झाली असल्याची टीका भाजपचे नेते सातत्याने करीत आहेत. त्याला काही समर्पक कारणे आहेत. त्या कारणांमध्ये पुन्हा डोकावण्याचे काही कारण नाही. तथापि एमआयएमची खेळी ही प्रत्यक्षात भाजपनेच रचलेले कारस्थान असल्याची हाकाटी शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. कारण हा राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष सध्या चांगलाच सापळ्यात सापडला आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा एमआयएमचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ठामपणे फेटाळून लावल्यानंतरही प्रकरण अजून शमलेले नाही. एमआयएमनेदेखील आपला हट्ट अजून सोडलेला नाही. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही भेटण्याची तयारी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दाखवली आहे. भूतकाळात डोकावले तर असे दिसते की, शिवसेनेने अनेकदा काँग्रेसची पाठराखण केली आहे. शिवसेना स्थापन झाली तेव्हा या पक्षाची पाठराखण काँग्रेसने केली होती हा इतिहास आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईतील कम्युनिस्टांचे वर्चस्व हटवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला मदत केली असा आरोप होत राहिला. पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचारही केला होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील, परंतु त्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आता काही अर्थ नाही. या सर्व प्रकरणांतून जमेल तितका लाभ उठवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. या राजकीय खेळामध्ये महाविकास आघाडीची बदनामी व्हायची तेवढी झालीच. त्यांचे दोन दोन दिग्गज नेते ठाम नकार देत असूनही या वादाला पूर्णविराम मिळत नाही हे कशाचे लक्षण आहे? महाविकास आघाडीच्या नेत्यांची विश्वासार्हता लयाला गेल्याचेच यामधून सिद्ध होते. हे सरकार जितका काळ सत्तेला चिकटून राहिल तितके दिवस या तिन्ही सत्ताधारी पक्षांची अब्रु चव्हाट्यावर टांगली जाणार हे वेगळे सांगायची गरज नाही. एका छोट्या पक्षाच्या छोट्या डावपेचाने हादरून गेलेली महाविकास आघाडी सध्या असहाय अवस्थेत आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply