Breaking News

प्यार किये जा @ ६० वर्षे…; फुल्ल टू मेहमूद एके मेहमूद कॉमेडी शो

कुंदनकुमार दिग्दर्शित ‘हिम्मत'(१९६९) या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचा हा किस्सा. जितेंद्र आणि अरुणा इराणी यांच्यावर चित्रित होत असलेल्या दृश्यात जितेंद्रला हसायचं होते. एकेक रिटेक वाढत वाढत गेला, पण काही केल्या त्याला मनसोक्त मनमुरादपणे ‘हसण्याचा अभिनय’ करता येईना. होते असे कधी कधी. त्याची ती अडचण सेटवरच असलेल्या मेहमूदला समजली. त्यावर मेहमूद म्हणाला, डरो मत! मै कॅमेरा के पीछे खडा रहता हू, तुम मेरी तरफ देखना, अपने आप हंसी आ जाऐगी…..
दिग्दर्शक म्हणाला, सायलेन्स…. लाइट्स कॅमेरा ॲक्शन…. दृश्य सुरू झाले आणि जितेंद्रची दिलखुलासपणे हसण्याची वेळ येताच त्याने मेहमूदकडे पाहिले आणि तो जो काही खो…खो…खो करत हसत सुटला त्याला त्याचं हसणं खिदळणे थांबवताच येईना…. मेहमूदने जितेंद्रला हसे फुटावे म्हणून चक्क आपली पॅन्ट खाली केली होती आणि तो केवळ लंगोटावर उभा होता. दृश्य डोळ्यासमोर आले की काय? खुद्द जितेंद्रला कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगताना हसू आवरत नव्हते. प्रत्यक्षात सेटवर त्याचं काय झालं असेल ते त्याला ठाऊक. चित्रपटाच्या दुनियेतील अशा गोष्टी, किस्से यांची रंगत भारी.
मेहमूदकडे विनोदबुद्धी ( विनोदाचे टायमिंग) असं काही भन्नाट होते की, त्याच्या खुमासदार शैलीतील विनोदामुळे चित्रपटाचा हीरो विसरला जाई आणि पब्लिक मेहमूदची कॉमेडी पुन्हा पुन्हा एन्जॉय करण्यासाठी पिक्चरचे तिकीट पुन्हा एकदा काढून पाह्यचे. सत्तरच्या दशकात मीदेखील असाच उद्योग करत फक्त आणि फक्त मेहमूदसाठीच मै सुंदर हू, दो फूल, कुवारा बाप, पडोसन , वरदान, सबसे बडा रुपय्या हे चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जॉय केले.
असाच एक ‘ मेहमूद ‘ मय धमाल चित्रपट ‘ प्यार किये जा ‘ या चित्रपटातील त्याचं वाह वाह प्रॉडक्शन आणि आपल्या बॅनरखाली पिक्चर काढण्याचं जबरा स्वप्न. आपल्या चित्रपटात भूमिका साकारल्याने तू स्टार होशील असे आपल्या प्रेयसीला म्हणजे मीना प्रियदर्शनीला ( मुमताज) दाखवलेले स्वप्न ( बरं हे सगळे तो धमाल ॲक्टिंग करुन दाखवतो) आणि या आपल्या चित्रपटासाठी आपले पिता रामलाल (ओम प्रकाश) यांना ज्या पध्दतीने ‘ स्टोरी सांगतो ‘ ते पाहून आपण बसल्या बसल्या भरपेट हसतो. त्याला भयपट बनवायचाय, आणि ते सांगताना घाबरवत घाबरवत तो एकेक दृश्य रंगवतो हा हिंदी चित्रपटाच्या वाटचालीतील सर्वोत्कृष्ट दहा विनोदी दृश्यातील एक. (विनोद साकारणं हा सर्वात अवघड अभिनय. दुर्दैवाने विनोदी कलाकाराला फारसं कोणी गंभीरपणे घेत नाहीत. टाईमपास करतो असं म्हटलं जातं. सी. व्ही. श्रीधर दिग्दर्शित ‘प्यार किये जा’
(मुंबईत प्रदर्शित २९ जुलै १९६६) च्या प्रदर्शनास साठ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत मेन थिएटर आमच्या गिरगावातील सेन्ट्रल.
मुळात हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट पहिल्यांदा १९६४ साली ‘ कथलोश नेरामिलाई ‘ या नावाने तमिळ भाषेत बनला, तो सुपर डुपर हिट म्हणून १९६५ साली ‘प्रेमिची चुड्डू ‘या तेलगू भाषेत त्याची रिमेक करण्यात आली. तोही हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी एन्जॉय केला जाऊ लागताच त्याची ‘प्यार किये जा’ या नावाने हिंदीत रिमेक केली. तोदेखील सुपर डुपर हिट. माझ्या पिढीने हा आणि असे आणखी अनेक चित्रपट सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मॅटीनी शो आणि रिपीट रनला एन्जॉय केले. ( त्या काळात दक्षिण मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये मॅटीनी शोला अप्पर स्टॉलचे तिकीट दर एक रुपया पाच पैसे असे ते परवडत असे. )१९७९साली याच चित्रपटाची कन्नड भाषेत ‘प्रोती मदु थमाशे नोडू’ या नावाने रिमेक केली. हे एवढ्यावरच थांबले नाही. पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपट असा सहजी थांबत नाही.चित्रपट संस्कृतीची हीच तर खरी गंमत आहे. प्यार किये जा या चित्रपटावरुन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे याने ‘धुम धडाका’ हा धमाल मनोरंजक चित्रपट बनवला. तो मुंबईत १९८५ सालच्या दिवाळीत पडद्यावर आला तोच पहिल्या शोपासूनच पब्लिककडून हाऊसफुल्ल गर्दीत ‘धडाकेबाज’ स्वागत.
मूळ चित्रपटाची धमाल गोष्ट अशी विविध भाषांतील चित्रपट रसिकांना आवडली. आजच्या पॅन इंडिया चित्रपट निर्मितीच्या युगात मुळात हा चित्रपट तमिळ भाषेत निर्माण होऊन एकाच वेळेस अन्य चार पाच भाषेत तो डब करुन प्रदर्शित झाला असता. पूर्वी रिमेक संस्कृती होती. त्या काळात चित्रपट डबही केले जात, पण त्या डबच्या खाणाखुणा जाणवत. आजच्या तांत्रिक प्रगतीत ते फारसे जाणवत नाही.
‘प्यार किये जा’मध्ये शशी कपूर, राजश्री, कल्पना, किशोरकुमार, मुमताज, ओम प्रकाश आणि…. आणि मेहमूद इत्यादींच्या प्रमुख भूमिका. पण सर्वाधिक भाव खाऊन जातो तो मेहमूद. बिचारा शशी कपूर. पहिल्यांदाच मेहमूदसोबत काम केले आणि श्रेय मेहमूदला गेला. खरं तर नायकाच्या भूमिकेसाठी राजेंद्रकुमारला विचारले असता त्याने नकार दिला ( मेहमूदच्या भूमिकेचं महत्व कदाचित लक्षात आले असावे. या चित्रपटाच्या यशापासून मेहमूदची “कॉमेडी नायक” या दिशेने पावले पडायला लागली आणि त्यातून त्याला मस्ताना, लाखों मे एक, अलबेला असे चित्रपट साकारता आले. कुवारा बाप या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक खुद्द तोच आहे.
प्यार किये जा या चित्रपटाची राजेंद्र कृष्ण यांची तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे. चित्रपटातील दिन जवानी के चार यार प्यार किये जा ( पार्श्वगायक किशोरकुमार), दिल हमे दे दिया ( लता मंगेशकर आणि किशोरकुमार), ओ मेरी मैना, तू मान ले मेरा कहना ( मन्ना डे आणि उषा मंगेशकर) ही गाणी लोकप्रिय ठरली. महेश कोठारेचा ‘ धुम धडाका ‘ पुणे शहरात प्रदर्शित व्हायच्या शुक्रवारी एका प्रदर्शकाने त्याच शुक्रवारी रिपीट रनला ‘ प्यार किये जा ‘ प्रदर्शित केला. महेश कोठारेना ही बाब अजिबात रुचली नाही म्हणून त्यांनी प्यार किये जाचे निर्माते श्रीधर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चिंता करू नकोस, तुझा मराठी चित्रपट अधिक धमाल उडवतो. त्याची लोकप्रियता नक्कीच वाढेल….धुम धडाकामध्ये शशी कपूरच्या जागी महेश कोठारे, किशोरकुमारच्या जागी अशोक सराफ आणि मेहमूदच्या जागी लक्ष्मीकांत बेर्डे अशी मस्त टीम.
लक्ष्मीकांत बेर्डेंला खरी ओळख मिळाली ती ‘धुमधडाका’ या सिनेमातून. हा मल्टिस्टारर सिनेमा होता. यात शरद तळवलकर, निवेदिता जोशी, प्रेमा किरण, सुरेखा, जयराम कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, सरोज सुखठणकर, बिपीन वर्टी इत्यादींच्या प्रमुख भूमिका. त्यात लक्ष्मीकांत बेर्डेंने आपल्या विनोदी भूमिकेचा ठसा उमटवला. हा सिनेमा लक्षाला कसा मिळाला याचाही किस्सा. लक्ष्मीकांत बेर्डेंनीच तो एकदा मला सांगितला होता. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करत होतो. बबन प्रभू यांनी केलेली भूमिका त्यांच्यानंतर लक्ष्या करत होता. महेशनं त्यातलं त्याच काम पाहिलं. त्याचवेळी त्यानं लक्ष्याला प्रॉमिस केलं की, ‘लक्ष्या, मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा तुला त्यात घेईन.’ महेश व लक्ष्याची ती पहिलीच ओळख होती. पण तो लक्ष्याचा कामावर जाम खूश होता. महेशने ठरवून टाकलं होतं की, श्रीधर दिग्दर्शित ‘प्यार किये जा’वर सिनेमा करायचाय आणि त्यात मेहमूदचा रोल लक्ष्या करणार. त्यावेळी त्याच्या सिनेमाचं नावही ठरलं नव्हतं. मग ते ‘धुम धडाका’ असं ठरलं.
जेव्हा महेश कोठारेने ‘धुम धडाका ‘ हा सिनेमा केला, तेव्हा महेश त्याचा शब्द विसरला नाही. लक्ष्याला वाटत होतं की त्याला चित्रपटात घेऊन महेशने रिस्कच घेतली होती. पण चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला.” महेश कोठारेने एकदा मला सांगितले,”माझे आई-वडील ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात काम करत होते. बबन प्रभू गेल्यानंतर काही काळाने दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांना हे नाटक त्यांच्या स्मरणार्थ पुन्हा करावं वाटू लागलं. तालमी सुरु झाल्या. बबन प्रभूंनी हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे मला प्रश्न पडला की, आता हे नाटक कोण करतोय? बाबांनी सांगितलं की, एक नवीन मुलगा आहे. मस्त काम करतोय. मी दुसऱ्या दिवशीच तालीम पाहायला गेलो. लक्ष्याला मी तिथं पाहिलं आणि मी लगेचच खिशातून एक रुपया काढून म्हटलं- लक्ष्या, हा एक रुपया… माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो तू. चित्रपट होता धुमधडाका.”
लक्ष्यानंही तो एक रुपया घेतला आणि तो चित्रपटासाठी कमिटेड झाला, असंही महेश कोठारे यांनी मला सांगितलं.’धुम धडाका’ने महेश-लक्ष्या ही जोडगोळीही हिट झाली. थरथराट, धडाकेबाज, दे दणादण, झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे अनेक हिट सिनेमे ‘महेश-लक्ष्या’नं दिले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे ही मैत्री ऑफस्क्रीनही तशीच होती. त्यामुळेच लक्ष्मीकांत हा माझा आत्मा आणि हृदय होता, असं महेश कोठारे म्हणतात. लक्ष्मीकांतने माझ्यासोबत काम करताना कधीही पैशांबद्दल विचारलं नाही. तो कॉन्ट्रॅक्ट साइन करायचा आणि अमाउंट तू टाक असं म्हणायचा, असंही महेश कोठारेंनी एकदा सांगितलं.
असो. आजच्या मल्टीप्लेक्स युगात ‘प्यार किये जा’ची रिमेक करता येईल, पण मेहमूद कुठून आणणार? एखाद्या कलाकाराला त्या उंचीचा
पर्याय न मिळणं हे त्या कलाकाराचे सर्वात मोठे यश आणि वैशिष्ट्य आहे. विनोदी चित्रपटाला कदाचित प्रतिष्ठा नसेल पण अशा अनेक चित्रपटांनी समाजाच्या अगदी खालच्या माणसापर्यंत भरपूर भरपेट मनसोक्त मनमुराद आनंद दिला हे देणं जास्त महत्त्वाचे आहे.

दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply