नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी
रोहे : प्रतिनिधी
रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्या नद्यांमध्ये कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी उन्हाळ्यात संथगतीने वाहत असते. या नदीकाठच्या गावांना पुर्वी पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती. मात्र धाटाव औद्योगिक वसाहत आल्यानंतर काही काळातच ही नदी प्रदुषणाच्या विळख्यात अडकली. या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी रोह्यापासून काही अंतरावर सोडण्यात आल्यानंतर नदीचे प्रदुषण कमी होवू लागले. या औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यातून अधुनमधून बाहेर पडणार्या सांडपाण्याचा प्रश्न कायम असतानाच आता नदीकाठच्या गावातील सांडपाणी येऊ लागल्याने कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. वरसे व रोहा अष्टमी शहरातून सर्वात जास्त सांडपाणी कुंडलिका नदीत येत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नदीपात्रात कचराही टाकला जात आहे. हे रोखण्याची आवश्यकता असून त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
भविष्यात सर्वत्र पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. सुदैवाने रोहेकरांची जीवनवाहिनी कुंडलिका नदी बारमाही वाहत आहे. पाणीही स्वच्छ असते. कुंडलिका नदीत स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प.पु.पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे स्वाध्यायी रोह्यात आल्यानंतर कुंडलिका नदीतील पाणी तीर्थ म्हणून आपल्या गावी नेत असतात. मात्र आज रोहा शहरात प्रवेश करताच कुंडलिका नदीची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कुंडलिका नदीला प्रदुषण मुक्त करण्याची आवश्यकता आहे.