पनवेल : वार्ताहर
सध्या ऑनलाइनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाइल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे मोबाइल वापर दिवसभर करत आहेत. त्यांना मैदानात घाम येण्याचे खेळ खेळण्याची नितांत गरज आहे, म्हणूनच, बाळगोकुलम या संस्थेतर्फे करंजाडे विभागात आकर्षक मैदानी खेळ विविध सोसायटीमध्ये जाऊन घेण्यात येत आहेत.
श्री स्वामी विवेकानंद जंयतीच्या निमित्ताने ‘बाळगोकुलम’तर्फे कंरजाडे येथे ट्रीसर हंट गेमचे आयोजन सेक्टर 3, रिलायन्स फ्रेश मॉलच्या शेजारी मैदानात आयोजित करण्यात आला होता. 10 ते 16 वयोगटातील 50 मुलामुलींनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यांना पाच गटांत विभागाण्यात आले व प्रथम सुगावा चिठ्ठी मैदानात देण्यात आली. त्यावरुन उरलेल्या नऊ सुगावा चिठ्ठी त्यांना शोधायच्या होत्या. शेवटची चिठ्ठी खजिना किल्ली असलेली सुगावा चिठ्ठी सर्व गटांना समान होती. विजेत्या गटाला ज्ञान रुपी खजिना – विविध पुस्तकांचे पारितोषिक व सन्मानचिन्हासहीत प्रमाणपत्र देण्यात आले.
कंरजाडे ते गव्हाण या आरोग्य विभागाचे अधिकारी सचिन सोनावणे हे प्रमुख अतिथी या नात्याने त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विवेकानंद केंद्र, पनवेल यांच्या तर्फे प्रा. संजीवनी धर्माधिकारी यांनी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान केले. बाळगोकुलंच्या निमंत्रक प्रा. सरोज गाडगीळ यांनी विविध सोसायटीमध्ये असेच अनोखे खेळ आयोजित करण्याचे आवाहन केले. या आयोजनात एकूण 26 कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper